FACT CHECK: गडचिरोली येथील शहिदांचे पार्थिव शवपेटीऐवजी बॉक्समध्ये आणण्यात आले का?

False राजकीय

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडाजवळ बुधवारी (1 मे) घडविलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये शीघ्रकृती पथकाचे (क्यूआरटी) 15 जवान शहीद झाले. यामुळे संपूर्ण राज्य दुःखात असताना सरकारने या शहिद जवानांचे पार्थिव आणण्यासाठी शवपेटीचीदेखील व्यवस्था केली नाही, असा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये कागदाच्या बॉक्समध्ये पार्थिव ठेवण्यात आल्याचे दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

पोस्टमध्ये म्हटले की, पटेलच्या पुतळ्यावर साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करणारे दरिद्री भाजप सरकार गडचिरोली येथील शहिदांची पार्थिव आणण्यासाठी शवपेटीसुद्धा देऊ शकत नाही. लाज वाटली पाहिजे फडणवीसला एव्हढे पाप कुठं फेडणार हे.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पोस्टमध्ये दिलेल्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा रेडिफ वेबसाईटवर खाली दिलेला फोटो आढळला. ही बातमी 9 ऑक्टोबर 2017 रोजीची आहे. अरूणाचल प्रदेशातील तवांग परिसरात 6 ऑक्टोबर 2017 रोजी हवाईलदलाचे हेलिकॉप्टर कोसळून सात जवानांचा मृत्यू झाला होता. तेव्हा या जवानांचे पार्थिव कागदाच्या बॉक्समध्ये आणण्यात आले होते.

मूळ फोटो येथे पाहा – रेडिफअर्काइव्ह

म्हणजे हा फोटो गडचिरोली येथील नसून, दोन वर्षांपूर्वीचा अरुणाचल प्रदेश येथील आहे. त्यावेळी या घटनेचा वेगळा फोटो निवृत्त लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग यांनीदेखील ट्विट करून मृत सैनिकांना शवपेटीऐवजी कागदाच्या बॉक्समध्ये आणण्याविषयी नाराजी व्यक्त केली होती.

अर्काइव्ह

सैनिकांचे पार्थिव कागदी बॉक्समध्ये आणल्यामुळे वाद वाढल्यावर, भारतीय सैन्याकडून याचा खुलासादेखील करण्यात आला होता. आर्मीने म्हटले की, हेलिकॉप्टर अपघात दुर्गम पहाडी भागात झाला होता. हेलिकॉप्टरला आग लागल्याने मृत पावलेल्या जवानांचे पार्थिव लवकरात लवकर नजीकच्या हेलिपॅडवर आणण्यासाठी मिळेल त्या साधनांचा वापर करण्यात आला. त्यावेळी शवपेटी तेथे नेणे शक्य नव्हते. असे अपवादात्मक परिस्थितीत करावे लागले.

मूळ स्टेटमेंटे येथे वाचा – पीआयबी

आर्मीच्या ट्विटर अकाउंटवरून अपघातातील मृत जवानांना यथायोग्य सन्मान दिल्याचा फोटो ट्विट करण्यात आला होता.

अर्काइव्ह

मग गडचिरोलीतील शहिद जवानांचे काय?

गडचिरोलीतील शहिद जवानांचा योग्य तो सन्मान करण्यात आला आहे. गुरुवारी (2 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते, अशी माहिती आकाशवाणीच्या बातमीत देण्यात आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या फोटोंमध्ये शहिदांचे पार्थिव शवपेटीत ठेवण्यात आले आहे.

अर्काइव्ह

निष्कर्ष

अरुणाचल प्रदेशमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृत जवानांच्या कागदी बॉक्समध्ये ठेवलेल्या पार्थिवाचे फोटो गडचिरोलीतील शहिदांचे म्हणून पसरविले जात आहेत. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: गडचिरोली येथील शहिदांचे पार्थिव शवपेटीऐवजी बॉक्समध्ये आणण्यात आले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False