खरंच हिंदी व प्रशांत महासागराचे पाणी एकमेकांत मिसळत नाही का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, शिवपुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे हिंदी व प्रशांत महासागर जेथे एकमेकांत मिसळत नाही तेथील हा व्हिडिओ आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे.

काय आहे दावा?

बोटीमधून काढलेल्या एका मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचे पाणी आणि हिरव्या रंगाचे पाणी स्पष्टपणे वेगवेगळे दिसते. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “हेच ते दोन महाकाय समुद्र ज्याचा भगवंताने शिवपुराण मध्ये ऊल्लेख केलेला आहे..कि जे आपापसांत मिसळत नाहीत. हिन्दी महासागर व प्रशांत महासागर. जबरदस्त दृश्य आहे. लाखो रूपये टाकून लोक ते पहाण्यास जातात. सर्वाना पाठवावे. अलग पौराणिक वास्तव्य.

मूळ फोटो – फेसबुक | अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील की-फ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर मार्यन पिअर्सन नावाच्या व्यक्तीने युट्युबवर अपलोड केलेला हा व्हिडिओ आढळला. सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ कॅनडातील फ्रेजर नदी (Fraser River)  जेथे जॉर्जिओ सामुद्रधुनीमध्ये मिसळते तेथील आहे. 

कॅनडातील ड्युक पॉईंट ते व्हँकुव्हर अशा बोट प्रवासादरम्यान मार्यन यांनी 2015 साली हा व्हिडिओ चित्रित केला होता. 

वेगवेगळ्या रंगाच्या पाण्याचे रहस्य काय?

जगामध्ये काही विशिष्ट ठिकाणी नदीचे गोड पाणी जेव्हा सागराच्या क्षारयुक्त पाण्यात मिसळते तेव्हा मिलनाच्या जागी पाण्याचा रंग वेगवेगळा दिसतो. या जागेला ‘डेड झोन’ म्हणतात. ‘डेड झोन’ हा काही नैसर्गिक चमत्कार नसून, मानवामुळे तो तयार होतो.

नॅशनल जिओग्राफिक आणि मायक्रोबायल लाईफ वेबसाईटवरील माहितीनुसार, समुद्र आणि तलावातील कमी ऑक्सिजन (Hypoxic) असलेली जागा म्हणजे ‘डेड झोन’. 


हे देखील वाचा:

अलास्काच्या खाडीमध्ये खरंच दोन महासागरांचे पाणी एकमेकांत मिसळत नाही का? 

अमेरिकेतील नदी-समुद्राचे मिलन की, हिंदी व प्रशांत महासागराच्या संगम?


पाण्यात जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त फॉस्फरस आणि नायट्रोजनसारखे न्युट्रिएन्ट्स (पोषकतत्वे) जमा होतात, तेव्हा फायटोप्लँकटॉन (Phytoplankton) आणि झूप्लँक्टॉन (Zooplankton) यांची पाण्याच्या तळाशी वाढ होऊन तेथील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होते. त्यामुळे त्याला डेड झोन म्हणतात.

पृष्ठभागावर जरी दोन्ही पाण्याचा रंग वेगवेगळा दिसत असताल तरी त्याखाली पाणी मिसळत असते. ते कसे खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पोस्टमध्ये दिलेला व्हिडिओ हिंदी आणि प्रशांत महासागराच्या मिलनाचा नाही. तो कॅनडातील फ्रेसर नदी जेथे जॉर्जियाच्या सामुद्रधुनीमध्ये जाऊन मिळते तेथील आहे. ‘डेड झोन’मुळे तेथे पाण्याचा रंग भिन्न दिसतो. त्यामुळे पोस्टमधील दावा असत्य आहे.

Avatar

Title:खरंच हिंदी व प्रशांत महासागराचे पाणी एकमेकांत मिसळत नाही का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False