राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्या चाहत्यांनाच श्रद्धांजली वाहिली का? वाचा सत्य

False राजकीय

माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी शोकसंदेश ट्विट करीत श्रद्धांजली वाहिली. सर्वच पक्षातील नेत्यांनी स्वराज यांच्या कार्याचा गौरव करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. राहुल गांधी यांनीदेखील ट्विटरवर सुषमा स्वराज यांना अभिवादन केले. परंतु, सोशल मीडियावर त्यांच्या ट्विटचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना श्रद्धांजली वाहिली असे दिसते. यावरून राहलु गांधी यांच्यावर कडाडून टीका होत आहे. पण सत्य काही तरी वेगळेच आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबकफेसबुक 

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये टीव्ही न्यूज चॅनेलवरील एक स्क्रीनशॉट देण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी ट्विट केल्याची बातमी दिसते.  यात लिहिले की, “राहुल गांधी ने किया ट्विट – लोग उनको काफी सम्मान करते थे । उनके परिवार और चाहने वालों को श्रद्धांजलि।“ अनेकांनी हा स्क्रीनशॉट शेयर करून दावा केला की, सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना श्रद्धांजली दिली. त्यावरून त्यांची खिल्लीदेखील उडविली जात आहे.

तथ्य पडताळणी

राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर खरंच असे ट्विट केले का याचा शोध घेतला. पोस्टमध्ये दिलेल्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हा स्क्रीनशॉट 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळले. गेल्या वर्षी 16 ऑगस्ट 2018 रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे निधन झाल्यावर राहुल गांधींनी सदरील ट्विट केल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.

अर्काइव्ह

याचा अर्थ की, हे ट्विट सुषमा स्वराज यांच्यासाठी नाही तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर करण्यात आले होते. परंतु, हे ट्विट खरे आहे का?

भाषांतरातील चूक

अटल बिहारी वाजपेयी यांना राहुल गांधी यांचे अभिवादन करणारे मूळ इंग्रजी ट्विट तुम्ही खाली पाहू शकता. सदरील स्क्रीनशॉटमध्ये या ट्विटचे चुकीचे हिंदी भाषांतर करण्यात आले आहे. शोकसंदेशामध्ये त्यांनी श्रद्धांजली म्हटलेले नाही. Condolence या शब्दाचा अर्थ श्रद्धांजली होत नाही. 

अर्काइव्ह

या ट्विटचे खरे भाषांतर असे हवे: 

देश ने आज एक महान सपूत खो दिया. पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयजी के प्रति लाखों दिलों में में प्रेम तथा आदर की भावना थी. उनके परिवार और उनके सभी प्रशंसकों के प्रति मेरी संवेदना व्यक्त करता हूं. वे हमेशा याद रहेंगे. (देशाने आज एक महान सुपुत्र गमावला. लाखो लोकांच्या मनात त्यांच्याप्रति प्रेम आणि सन्मानाची भावना होती. त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांसमवेत माझा शोक व्यक्त करतो. ते कायम स्मरणात राहतील.)

शब्दकोश काय सांगतो?

Condolence या शब्दाचा हिंदी अर्थ होतो शोक प्रकट करना. म्हणजे दुःख, संवेदना व्यक्त करने.

मूळ अर्थ येथे पाहा – कोलिन्स डिक्शनरी

श्रद्धांजली या शब्दाला इंग्रजीत Homage किंवा Tribute असे शब्द आहेत. श्रद्धांजली अर्पित करणे याला इंग्रजीत To pay homage किंवा To pay tribute असे म्हणतात.

मूळ अर्थ येथे पाहा – कोलिन्स डिक्शनरी

मग राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्यासाठी कोणता शोकसंदेश दिला?

राहुल गांधी यांनी 6 ऑगस्ट रोजी ट्विट केले की, सुषमा स्वराज यांच्या निधनाची वार्ता कळाल्यावर धक्काच बसला. सुषमाजी एक असाधारण राजकीय नेत्या, उत्तम वक्त्या आणि उत्कृष्ट संसदपटू होत्या. सगळ्या पक्षांमध्ये त्यांचे मित्र होते. या दुःखाच्या काळात त्यांच्या कुटुंबांप्रति माझ्या संवेदना प्रकट करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती.

अर्काइव्ह

निष्कर्ष

सुषमा स्वराज यांच्या निधनाविषयी राहुल गांधी यांच्या नावे फिरणारे ट्विट मूळात अटल बिहारी वाजपेयी यांच्यासाठी करण्यात आले होते. तसेच टीव्ही चॅनेलने राहुल गांधींच्या इंग्रजी ट्विटचा चुकीचा हिंदी अनुवाद केला होता. त्याचाच हा स्क्रीनशॉट आहे. त्याचा आणि सुषमा स्वराज यांच्या निधनाचा काही संबंध नाही.

Avatar

Title:राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्या चाहत्यांनाच श्रद्धांजली वाहिली का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False