
इचलकरंजीत पकडलेल्या मगरीचा एक व्हिडिओ Sangli.city या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
इचलकरंजीत मगर पकडण्यात आल्याची ही घटना घडली का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही इचलकरंजीत मगर पकडली असा शब्दप्रयोग करुन शोध घेतला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला.
यात परिणामात यूटुयबवर इचलकरंजीत मगर पकडण्यात आल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ आम्हाला दिसून आले. हेच व्हिडिओ अन्य समाजमाध्यमांमध्येही दिसून येत असल्याने आम्ही या व्हिडिओतील आवाज नीट ऐकले यातील Kolhapur Sangli (Archive) या पेजवरील व्हिडिओत येथील नागरिक गुजराती आणि हिंदी बोलत असल्याचे स्पष्ट ऐकू येते. इचलकरंजीत शहरात मराठी भाषिकांचे प्राबल्य असताना हे नागरिक हिंदी अथवा गुजराती कसे बोलत आहेत, असा प्रश्न आम्हाला पडला. आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला त्यावेळी आम्हाला झी 24 तास या वृत्तवाहिनीने 6 ऑगस्ट 2019 दिलेले खालील वृत्त दिसून आले.
या वृत्ताच्या सत्यतेविषयी शंका असल्याने आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. आम्ही इचलकरंजी नगरपरिषदेचे आपातकालीन विभागाचे संजय कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा व्हिडिओ इचलकरंजी येथील नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आम्हाला हा प्रश्न पडला की हा व्हिडिओ नेमका आहे कुठला? या व्हिडिओत गुजराती भाषा आढळून येत असल्याने आम्ही crocodile found in Gujarat असे टाकून हे वृत्त शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम दिसून आला.
या परिणामात माध्यमांनी ही मगर गुजरातमधील वडोदरा या शहरात आलेल्या पुराच्या पाण्यासोबत शहरात आल्याचे म्हटले आहे. या मगरीला एनडीआरएफच्या चमुने पकडले असल्याचे सांगण्यात आले आहे. हा तोच व्हिडिओ आहे जो इचलकरंजीचा म्हणून पसरविण्यात येत आहे.
इंडिया टूडेने या घटनेचे वृत्त दिले आहे. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तात वन्यजीव संरक्षक नेहा पटेल यांनी या बचाव कार्याची माहिती दिली आहे. ती आपण खाली पाहू शकता.
द टाईम्स ऑफ इंडियाने या घटनेच्या व्हिडिओसह 4 ऑगस्ट 2019 रोजी याबाबत दिलेले वृत्त आपण खाली पाहू शकता.
निष्कर्ष
इचलकरंजी नगरपरिषदेचे आपातकालीन विभागाचे संजय कांबळे यांनी हा व्हिडिओ इचलकरंजी येथील नसल्याचे स्पष्ट केले आहे. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ वडोदरा येथील असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे सिध्द होत आहे.

Title:Fact Check : इचलकरंजीत पकडलेल्या मगरीचा हा व्हिडिओ आहे का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
