सय्यद गिलानी यांना स्थनाबद्ध केल्याचा जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य काय आहे

False राजकीय | Political

संसदेच्या दोन्ही सभागृहांत ‘आर्टिकल 370’ रद्द करण्याचे विधेयक पारित झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष दर्जाचा आधार असलेला हा अनुच्छेद रद्द केल्यानंतर हिंसक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता ओळखून केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक संवेदनशील भागात संचारबंदी लागू केलेली आहे. तसेच इंटरनेट सेवादेखील खंडित करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडियो क्लिप मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. यामध्ये स्थानबद्ध केलेले फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी बाहेर पडण्याची विणवणी करताना दिसतात. अनेक पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी हा व्हिडियोच्या आधारे दावा केला की, ‘आर्टिकल 370’ रद्द केल्यानंतर भारतीय सैन्याने गिलानी यांना स्थानबद्ध केले आहे. भारतातही अऩेक युजर्सने याच दाव्यासह हा व्हिडियो शेयर केला.

काय आहे क्लिपमध्ये?

45 सेंकदाच्या या व्हिडियो क्लिपमध्ये सय्यद गिलानी दरवाजाच्या आतून बाहेर सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याची विनंती करत आहेत की, दरवाजा खोलो, हमें बताओ क्यों बंद किया. आपने कहा था हम आझाद है, जहां चाहे वहां जा सकते है…दरवाजा खोलो कोई…उड कर थोडे जाएंगे. हिंदुस्थान की जम्हुरियत का जनाजा निकल रहा है…खोलो..

तथ्य पडताळणी

या व्हिडियोची सत्यता पडताळण्यासाठी गुगलवर – तुम्हारी जम्हुरियत का जनाजा निकल रहा है – असे सर्च केले. तेव्हा ट्विटरवर गिलानी यांचा हाच व्हिडियो आढळला. एका युजरने 4 एप्रिल 2018 रोजी अपलोड केला होता. म्हणजे हा व्हिडियो एका वर्षापूर्वीपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

https://twitter.com/haziq_qadri/status/981562499865735170

अर्काइव्ह

हा धागा पकडून शोध घेतला असता कळाले की, शोपियन येथे भारतीय सैन्याने 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या चकमकीत 4 नागरिकांचादेखील मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी गिलानी आणि मिरवैज उमर फारूक यांसारख्या फुटीरतावादी नेत्यांनी रॅली काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पोलिसांनी या दोघांना त्यापूर्वीचा 4 एप्रिल 2018 रोजी स्थानबद्ध केले. हा व्हिडियो तेव्हाचा आहे.

मूळ बातमी येथे वाचा- काश्मीर रिडरअर्काइव्हद स्टेट्समनअर्काइव्ह

ग्रेटर काश्मीर वेबसाईटनेदेखील 4 एप्रिल 2018 रोजी हा व्हिडियो शेयर करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. 

मग सध्या काय स्थिती आहे?

आर्टिकल 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील संवादाच्या माध्यमांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. द ट्रिब्युनने दिलेल्या बातमीनुसार, तेथील फुटीरतावादी नेत्यांचा सध्या काहीच पत्ता नाही. अनेक नेत्यांना स्थानबद्ध केल्याची चर्चा आहे. परंतु, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सय्यद गिलानी, मिरवैझ फारूख सध्या शांत असून त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे कळू शकलेले नाही. सय्यद गिलानी यांचे ट्विटर अकाउंटदेखील बंद करण्यात आले आहे. याचाच अर्थ की, गिलानी यांना सध्या स्थानबद्ध केले असेल असे मानले तरी, हा व्हिडियो आताचा नाही.

मूळ बातमी येथे वाचा – द ट्रिब्युनअर्काइव्ह

निष्कर्षः

सय्यद गिलानी यांना स्थानबद्ध केल्याचा व्हिडियो गेल्या वर्षीचा आहे. शोपियन येथे भारतीय सैन्याविरोधात काढण्यात येणाऱ्या रॅलीपूर्वी त्यांना घरातच 4 एप्रिल 2018 रोजी स्थानबद्ध करण्यात आले होते. हा व्हिडियो तेव्हाचा आहे.

Avatar

Title:सय्यद गिलानी यांना स्थनाबद्ध केल्याचा जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य काय आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False