ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांचा हा व्हिडियो नाही; वाचा सत्य

Coronavirus False
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

आपल्याला कोरोना आहे की नाही हे ओळखण्याची सोपी आणि घरगुती चाचणी सांगणारा एक व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील प्रसिद्ध डॉ. शरद उदवाडिया यांच्या नावे पसरणाऱ्या या व्हिडियोत सांगितले जाते की, कोरोनाचा रुग्ण तीन सेकंदांपेक्षा श्वास रोखून नाही शकत. त्यामुळे रोज सकाळ-सायंकाळ दोन वेळा श्वास रोखून बघा की, किती वेळ तुम्ही तो रोखून धरू शकता. 

फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियो पडताळणी केली असता कळाले की, हा व्हिडियो ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांचा नाही तसेच यात सांगतलेले उपायदेखील चुकीचे आहेत.  

काय आहे पोस्टमध्ये? 

सुमारे साडेचार मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक डॉक्टर कॅबिनमध्ये बसून रुग्णांना मार्गदर्शन करीत आहे. तो सांगतो की, कोरोनाची बाधा झाल्यावर तीव्र ताप येतो. तसेच कोरडा खोकला येतो. कफ असणारा खोकला असेल तर कोरोना नाही असे समाजावे. सामान्य व्यक्ती साधरणपणे 40 ते 60 सेकंदांपर्यंत श्वास रोखू शकतो. कोरोनाचा रुग्ण मात्र तीन सेकंदही श्वास नाही रोखू शकत. त्यामुळे जर आपण रोज दोन वेळा श्वास रोखून पाहायचे की, श्वास रोखून धरण्याची आपली वेळ कमी तर होत नाहीए ना. 

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर शोध घेतला असता ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. शरद उदवाडिया नावाचे वैद्यकीय तज्ज्ञ नसल्याचे आढळले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या संकेतस्थळास भेट दिली असता तेथे डॉ. झहीर उदवाडिया आणि डॉ. फारूख उदवाडिया ही नावे आहेत. परंतु, डॉ. शरद उदवाडिया असे नाव तेथे आढळले नाही. 

फॅक्ट क्रेसेंडोने मग ब्रीच कँडी रुग्णालयाशी संपर्क साधला. रुग्णालयाकडून डॉ. शरद उदवाडिया नावाचे कोणीही डॉक्टर तेथे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

रुग्णालयातील डॉ. झहीर उदवाडिया हे राज्याच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य असून  जागतिक आरोग्य संघटनेशी निगडित आहेत. त्यांनी दिलेली मुलाखत आपण खाली पाहू शकता. यात त्यांनी कुठेही अशा स्वरुपाचा दावा केलेला नाही.

यावरून हे तर स्पष्ट आहे की, हा व्हिडियो ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांचा नाही. मग यात सांगण्यात आलेल्या चाचणीचे काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, दहा सेकंदापेक्षा जास्त काळ श्वास रोखून धरणे ही कोविड-19 ची चाचणी करण्याची योग्य पद्धत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रयोगशाळेतून ही चाचणी करुन घेणे योग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

WHO.png

जागतिक आरोग्य संघटनेचे संकेतस्थळ / संग्रहित 

निष्कर्ष 

डॉ. शरद उदवाडिया यांच्या नावाने फिरणाऱ्या व्हिडियोतील व्यक्ती कोण आहे, हे जरी स्पष्ट होत नसले तरी ब्रीच कँडी रुग्णालयातील ते डॉक्टर नाहीत. तसेच या व्हिडियोत सांगण्यात आलेली चाचणी अयोग्य आहे.

Avatar

Title:ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांचा हा व्हिडियो नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •