तो व्हायरल व्हिडियो नगरसेवक मुकुंद केणी यांच्या अंत्यसंस्काराचा नाही. वाचा सत्य

Coronavirus False राजकीय | Political

कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकुंद केणी यांचे कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडियो व्हायरल होत आहे. काही जणांनी हा व्हिडियो पुण्यातील मुकुल वासनिक यांच्या अंत्यविधीचा असल्याचा दावाही केला आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा व्हिडियो मुकुंद केणी किंवा मुकुल वासनिक यांच्या अंत्यविधीचा नसल्याचे कळाले.

काय आहे पोस्टमध्ये?

व्हिडियोमध्ये शववाहिकेतून एक मृतदेह बाहेर काढून त्याच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याचे दिसते. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “ठाण्याचे नगरसेवक मुकुंद केणी १५०० कोटींची प्रॉपर्टी असून पण काय परिस्थिती आली पहा…घरी रहा सुरक्षित रहा.” 

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

गुगलवर मुकुंद केणी यांच्याविषयी सर्च केले असता, दैनिक लोकमतच्या संकेतस्थळावरील 16 जून 2020 रोजीचे वृत्त आढळले. नगरसेवक मुकुंद केणी यांच्या अंत्यविधीचा बनावट व्हिडियो समाजमाध्यमात व्हायरल करण्यात येत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. मुकुंद यांचे पुत्र मंदार केणी यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. 

lokmat.png

लोकमत / संग्रहित वृत्त

फॅक्ट क्रेसेंडोने कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. जी. दरेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, याप्रकरणी तक्रार आली असून सध्या तपास सुरू आहे. 

मंदार केणी यांनी फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना स्पष्ट केले की, व्हायरल होत असलेला हा व्हिडियो त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीचा नाही. त्यांच्या वडिलांचा अंत्यविधी ठाण्यामध्ये विद्युत दाहिनीत करण्यात आला होता, अशी त्यांनी माहिती दिली. त्याची छायाचित्रेही त्यांनी पाठवली. ती आपण खाली पाहू शकता.

mukund keni.png

हा व्हिडियो नेमका कुठला आहे असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. व्हिडियो नीट पाहिला असता, त्यात शववाहिनीवर वसई महापालिका असा उल्लेख असल्याचे दिसून आले.

vasai corporation.png

त्यानंतर वसई तालुक्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींचा शोध घेतला. त्यावेळी कळाले की, एका पोलीस कर्मचाऱ्याचे कोरोनामुळे निधन झाले. या कर्मचाऱ्याच्या अंत्यविधीला उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक विजय माडये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा व्हिडीओ पाहून तो  नालासोपारा येथील स्मशानभूमीतील असल्याचे असे सांगितले. 

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ ठाणे अथवा पुण्यातील नसून नालासोपारा येथील एका अंत्यविधीचा आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकुंद केणी किंवा पुण्यातील मुकुल वासनिक यांच्या अंत्यविधीचा नाही.

Avatar

Title:तो व्हायरल व्हिडियो नगरसेवक मुकुंद केणी यांच्या अंत्यसंस्काराचा नाही. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False