फेक न्यूजः IAS टॉपर मुलीने वडिलांना त्यांच्याच रिक्षात बसवून फिरवले का?

False सामाजिक

हातरिक्षामध्ये बसलेल्या एका व्यक्तीला ओढत असलेल्या तरुण मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. सोबत दावा केला जात आहे की, कोलकातामधील या मुलीने आयएएस टॉपर झाल्यानंतर आपल्या वडिलांना त्यांच्याच हातरिक्षात बसवून स्वतः ओढत शहरभर फिरवले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. ही मुलगी ना आयएएस टॉपर आहे, ना ते रिक्षाचालक तिचे वडिल आहेत.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हा फोटो कोलकाता मधील असून ही मुलगी त्या रिक्षावाल्याचीच आहे. त्याने कष्ट करून आपल्या मुलीला शिकवले. आज ती मुलगी IAS टॉपर झाली असून वडिलांच्या कष्टाच्या सन्मान म्हणून तिने त्यांना रिक्षा बसवून पूर्ण शहरभर फिरवले.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लोकसेवा परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यामध्ये बिहार येथील आणि आयआयटी मुंबई येथील पदवीधारक शुभम कुमार याने पहिला क्रमांक मिळवला. म्हणजे यंदाच्या परीक्षेत कोणी मुलगी टॉपर नाही. 

मग हा फोटो कोणाचा आहे?

हा फोटो शरमोना पोद्दार नावाच्या एका मुलीचा आहे. ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकांउटचे नाव Mishti and Meat आहे. या अकाउंटवरून तिने 25 एप्रिल 2018 रोजी रिक्षा ओढतानाचा हा फोटो शेअर केला होता. 

या फोटोसोबत शरमोनाने लिहिलेल्या माहितीनुसार, ती कोलकाता शहरात फिरायला गेली होती. तिला एक हातरिक्षाचालक दिसल्यावर तिने त्याच्याकडे रिक्षा ओढू देण्याची विनंती केली होती. तेव्हा तिने हा फोटो घेतला होता.

“जेव्हा मी कोलकाता येथे गेले होते तेव्हा हातरिक्षा दिसली. ती ओढताना किती कष्ट करावे लागतात हे पाहण्यासाठी मी चालकाकडे त्यांना बसून रिक्षा ओढू देण्याची मागणी केली. शोभाबाजार भागात मी जेव्हा रिक्षा ओढत होते तेव्हा सगळे लोक माझ्याकडे पाहत होते,” असे शरमोनाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले होते.

वाईल्डक्राफ्ट कंपनीने तिची ही ट्रीप स्पॉन्सर केली होती. त्यांनीदेखील हा फोटो शेयर केला होता.

शरमोना पोद्दार आणि वाईल्डक्राफ्ट कंपनीच्या पोस्टमधील माहितीवरून हे स्पष्ट होते की, शरमोना ही कोणी आएएस टॉपर नाही आणि हातरिक्षात बसलेली व्यक्ती तिचे वडिलही नाही. ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर असून, तिने कोलकाता ट्रीपच्या वेळी हा फोटो घेतला होता.

मग आयएएस टॉपर मुलीची अफवा पसरली कशी?

तमिळनाडूतील काँग्रेसचे नेते डॉ. जे. अस्लम बाशा यांनी 4 ऑक्टोबर 2018 रोजी शरमोनाचा हा फोटो ट्विट करून “आयएएस टॉपर मुलीने वडिलांना हातरिक्षात फिरवल्याचा” दावा केला होता. यानंतर हा फोटो अशा चुकीच्या माहितीसह व्हायरल झाला.

अगदी काँग्रेस नेते शशी थरून यांनीदेखील ही असत्य पोस्ट रिट्विट केले होती. फोटोवरून गैरसमज पसरल्यानंतर वाईल्डक्राफ्ट कंपनीने ट्विट करून या प्रकरणी खुलासा केला होता. खोट्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले होते.

अर्काइव्ह

निष्कर्ष

वडिलांना हातरिक्षातून फिरवणारी आयएएस टॉपर मुलगी म्हणून पसरविला जाणारा फोटो मूळात शरमोना पोद्दार नावाच्या ट्रॅव्हल ब्लॉगरचा आहे. कोलकाता येथे फिरायला गेलेली असताना तिने एका हातरिक्षाचालकाला विनंती करून हा फोटो घेतला होता. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:IAS टॉपर मुलीने वडिलांना त्यांच्याच रिक्षात बसवून फिरवले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False