कुख्यात गँगस्टर अबू सालेमच्या भावासोबत अभिनेत्री कंगनाचा फोटो अशा दाव्यासह एक छायाचित्र व्हायरल होत आहे. काहींनी तर ही व्यक्ती खुद्द अबू सालेमच आहे, असेही म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे दोन्ही दावे खोटे सिद्ध झाले.

काय आहे दावा?

कंगना आणि एका व्यक्तीचा फोटो शेयर करून कॅप्शन दिली आहे की, “लाडकी कंगना राणावत लढाईसाठी जाण्याअगोदर एनर्जी ड्रिंक घेताना.....अबू सालेम च्या भावा सोबत.”

काही जणांनी हाचा फोटो शेयर करीत दावा केला आहे की, या फोटोत कंगना आणि स्वतः अबू सालेम आहे. “झाशीची राणी देशद्रोही अबू सालेमला धडा शिकवतांनाचा एक क्षण,” अशी पोस्टमध्ये कॅप्शन आहे.

फेसबुक पोस्ट | संग्रहित

तथ्य पडताळणी

कंगनासोबत दिसणारी ही व्यक्ती खरंच अबू सालेम किंवा त्याचा भाऊ आहे का, याचा शोध घेतला. रिव्हर्स इमेज केले असता हफिंग्टन पोस्ट वेबसाईटवरील 2017 मधील एका लेखात हा फोटो वापरल्याचे आढळले.

पत्रकार मार्क मॅन्युएल यांनी "कंगनाला हे माहित असले पाहिजे की ती इतकी प्रभावशाली आहे की तिने आपल्या वैयक्तिक जीवनावर चर्चेचा विषय बनू नये," अशा मथळ्याखाली कंगनाविषयक हा लेख लिहिला होता.

image3.png

संग्रहित

लेखात वापरण्यात आलेल्या फोटो खाली मार्क मॅन्युएल यांचे नाव आहे. मुंबईतील खार येथील कॉर्नर हाऊसमध्ये हे छायाचित्र घेण्यात आले होते.

हा धागा पकडून अधिक शोध घेतला. मार्क मॅन्युएल यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर 15 सप्टेंबर 2020 रोजी हा फोटो शेयर केला होता. कंगनाच्या 'सिमरन' चित्रपटनिमित्त ही भेट झाली असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकसंग्रहित

कोण आहे मार्क मॅन्युएल?

मॅन्युएल हे 2017 साली हफिंग्टन पोस्ट वेबसाईटचे संपादक होते. सुमारे तीन दशकांपासून ते कार्यरत असून सिनेपत्रकारितेमध्ये त्यांचे मोठे नाव आहे.

त्यांचा कंगनासोबतचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे या सर्व प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

म्हणजे कंगनासोबत या फोटोत आबू सालेम किंवा त्याचा भाऊ नाही. ते पत्रकार मार्क मॅन्युएल आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गँगस्टर आबू सालेम 2002 पासून तुरुंगाची हवा खात आहे. कंगनाने 2006 साली हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

अबू सालेम आणि पत्रकार मार्क मॅन्युएल यांच्या छायाचित्राची खाली तुलना करण्यात आली आहे.

COMPARE.png

निष्कर्ष

व्हायरल फोटोमध्ये अभिनेत्री कंगना रणौतसोबत आबू सालेम किंवा त्याचा भाऊ नाही. ते सिनेपत्रकार मार्क मॅन्युएल आहेत. 2017 साली चित्रपट प्रोमोशनदरम्यान एका मुलखातीचा तो फोटो आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील दावे खोटे आहेत.

Avatar

Title:या फोटोत कंगनासोबत अबू सालेम किंवा त्याचा भाऊ नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False