
गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत आहे. शिवसेनेवर निशाणा साधत तिने देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळाची स्तुती करणारे ट्विटही केले. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कंगनाने 2017 साली नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप करणारे ट्विट केले होते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे ट्विट कंगनाने केले नव्हते असे समोर आले.
काय आहे दावा?
कंगना राणावत असे या अकाउंटचे नाव आहे. हे ट्वीट 9 सप्टेंबर 2017 साली केल्याचे दिसते. यात म्हटले की, “जो बच्चे स्कूलों मे यौनशोषण का विरोध करते है वो मार डाले जाते हैं और जो बच्चे समझौता करके आनन्द उठाते हैं वो बड़े होकर मोदी बन जाते हैं!”
या ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर कॅप्शन दिले की, “हे बघा काय म्हणाली होती 2017 ला #कंगनाहमारीमाता.”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
पोस्टमधील ट्विटचे नीट निरीक्षण केले असता दिसते की, ट्विटर हँडल @Kangana_Soni_86 असे आहे. ट्विटरवर या नावाचे अकाउंट शोधले असता कोणतेही अकाउंट सापडले नाही.
मग हे कंगना रणौतचे अधिकृत ट्विटर अकाउंट आहे का?
कंगना अनेक वर्षे ट्विटरवर नव्हती. 2015 साली तिच्या टीमतर्फे तिच्या नावाने अकाउंट सुरू करण्यात आले. सुशांत प्रकारणामध्ये चर्चेत आल्यानंतर तिने 21 ऑगस्ट रोजी अधिकृतरीत्या ट्विटरवर प्रवेश केला.
तिचे अधिकृत ट्विटर हँडल @KanganaTeam असे आहे.

ट्विटरवर तिचे नाव वापरून अनेक जणांचे ट्विटर अकाउंट्स आहेत. परंतु, तिचे केवळ एकच अधिकृत ट्विटर अकाउंट आहे जे ब्लू टिकद्वारे प्रमाणित आहे.
कंगनाच्या अधिकृत अकाउंटवरून 9 सप्टेंबर 2017 रोजी एकूण 9 ट्विट करण्यात आले होते. हे सर्व तिच्या ‘सिमरन’ नावाच्या चित्रपटासंदर्भात होते. ते सर्व आपण या लिंकवर पाहू शकता. उदाहरण म्हणून एक ट्विट खाली देत आहोत.
यावरून स्पष्ट होते की, कंगनाच्या नावे फेक अकाउंट तयार करून ते आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले होते. विशेष म्हणजे @Kangana_Soni_86 या फेक अकाउंटवरून भाजपच्या विविध नेत्यांवर टीका करणारे ट्विट करण्यात आले होते. ते अकाउंट बंद होण्यापूर्वी एका युजरने तसे नमुदही केले होते.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, कंगनाने 2017 साली नरेंद्र मोदींविषयी कोणतेही आक्षेपार्ह ट्विट केले नव्हते. तिच्या नावे फेक अकाउंट तयार करून ते करण्यात आले होते आणि त्याचा स्क्रीनशॉट आता व्हायरल होत आहे.

Title:कंगनाने 2017 साली नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह ट्विट केले होते का? वाचा सत्य
Fact Check By: Milina PatilResult: False
