जपानमध्ये मुस्लिमांना नागरिकत्व देत नसल्याचा मेसेज चुकीचा. तसा काही नियमच नाही. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

मुस्लिमांना नागरिकत्व न देणारा एकमेव देश म्हणजे जपान! अस धदांत खोटा मेसेज गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर पसरविला जातो. अनेक वेळा तो खोटा असल्याचे सिद्ध होऊनही तो वेळोवेळी शेयर केला जातो. अनेक जण त्यावर विश्वास ठेवून त्याला खरंसुद्धा मानतात. सध्या हाच मेसेज पुन्हा फिरत आहे. ‘MPSC and UPSC कट्टा’ नावाच्या फेसबुक पेजने तो शेयर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी करून सत्य समोर आणले आहे.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

जपानमध्ये खरंच धर्माच्या आधारावर नागरिकत्व नाकारता येते का याचा शोध घेतल्यावर हे खोटं असल्याचे समजले. जपानचे नागरिकत्व मिळवण्यासाठी काय लागते याचा सर्वप्रथम शोध घेतला. जपानच्या ‘डिपार्टमेंट ऑफ जस्टीस’च्या वेबसाईटवर याची माहिती दिली आहे.

जपान नागरिकत्व कायदा, 1950

जपानचा नागरिकत्वाचे सर्व नियम व अटी या कायद्याअंतर्गत दिलेल्या आहेत. यामध्ये कुठेही धर्माच्या आधारे नागरिकत्व देणे किंवा नाकारण्याचा उल्लेख नाही. उलट इतर देशांच्या नागरिकांना जपानचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्जदाराने खालील बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे

1. जपानमध्ये किमान 5 वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य

2. वयाची किमान 20 वर्षे पूर्ण

3. वर्तणूक आणि चरित्र स्वच्छ असावे

4. तुम्ही किंवा जोडीदार अर्थार्जन करीत असावा (नोकरी/व्यवसाय)

5. आधीच्या देशाचे नागरिकत्व सोडून केवळ जपानचेच नागरिकत्व स्वीकाराणे

6. जपानच्या संविधानाचा आदर आणि सरकारविरोधातील राजकीय हिंसाचार न करणे

मूळ नियय येथे वाचा – इम्मिग्रेशन । जपान नॅशनलिटी लॉ

यामध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नाही. याचा अर्थ तुमचा धर्म कोणताही असो तुम्हाला त्या आधारे नागरिकत्व देणे किंवा नाकारण्याचा कोणताही नियम जपानमध्ये नाही.

एवढंच नाही तर जपानमध्ये कायम वास्तव्याची (Permanent Residence) परवानगी देतानासुद्धा धर्माचा विचार केला जात नाही. जपानच्या स्थलांतर सेवा विभागाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचींमध्ये मुस्लिम धर्माच्या नागरिकाला कायम वास्तव्य दिले जाणार नाही, असे म्हटलेले नाही. तसेच कायम वास्तव्यासाठी करते वेळ भराव्या लागणाऱ्या अर्जामध्ये ‘धर्म’ हा रकानाच नसतो. म्हणजे अर्जदाराला धर्म सांगावाच लागत नाही. 

मूळ नियम येथे वाचा – डिपार्टमेंट ऑफ जस्टीसPemanent Residence Form

यावरून स्पष्ट होते की, जपानमध्ये मुस्लिमांना नागरिकत्व देण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. 

जपानमध्ये मुस्लिम समुदाय

जपानमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून मुस्लिम धर्माचे लोक राहत आलेले आहेत. तेथे कमी पण लक्षणीय मुस्लिम लोकसंख्या आहे. जपानमध्ये धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्यात येत नसल्यामुळे अशा नागरिकांची संख्यात्मक माहिती उपलब्ध नाही. परंतु, काही विद्यापीठे आणि संस्थांनी केलेल्या अध्ययनानुसार, 2011 मध्ये जपानमध्ये सुमारे एक लाख मुस्लि लोक होते. अल जझिराच्या लेखानुसार, सत्तरच्या दशकात जपानमद्ये केवळ 20 मशीदी होत्या. मात्र, 2014 मध्ये ही संख्या 200च्या वर गेली आहे. जपानचे पंतप्रधान शिन्झो आबे यांनी 2017 साली इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. जपानमध्ये अनेक मुस्लिम देशांचे दुतावास आहेत.

निष्कर्ष

जपानमध्ये मुस्लिमांनादेखील नागरिकत्व दिले जाते. जपानमध्ये धर्माच्या आधारे भेद करण्याचे प्रावधानच नाही. तेथे धर्माच्या आधारावर नागरिकत्वाच देणे किंवा नाकारण्यात येत नाही. हा मेसेज खोटा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. यापूर्वी याचे फॅक्ट क्रेसेंडो, स्नोप्स, एएफपी यांनी फॅक्ट चेक केलेले आहे.

Avatar

Title:जपानमध्ये मुस्लिमांना नागरिकत्व देत नसल्याचा मेसेज चुकीचा. तसा काही नियमच नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False