पिल्लांना चित्त्यापासून वाचविण्यासाठी या हरणाने स्वतःचा जीव गमावला का? वाचा या फोटोची खरी कहाणी

False आंतरराष्ट्रीय

चित्त्यांच्या कळपामध्ये सापडलेल्या हरणाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. त्यासोबत दावा केला जात आहे की, आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी या हरणाने स्वतःला चित्त्यांच्या हवाली केले. हे करुणामय दृश्य टिपणाऱ्या छायाचित्रकारालासुद्धा नैराश्य आले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की या फोटोसोबत केला जाणारा दावा असत्य आहे.

 काय आहे दावा?

तीन चित्ते एका हरणाच्या गळ्याचा घोट घेत असल्याचा फोटो शेयर करून म्हटले आहे, की हा फोटो जगातील सर्वोत्कृष्ट फोटो समजला जातो… त्याचं कारण म्हणजे ज्या फोटोग्राफरने हा फोटो काढला नंतर तो डिप्रेशन मध्ये गेला… घटना अशी होती की दोन चित्ते एका हरणीच्या मागे लागले होते… ती हरिण आपल्या पिलासोबत होती, जर आपला जीव वाचवायचा असता तर ती पळून जाऊ शकली असती परंतु तिची पिल्लं तिच्यासोबत येऊ शकली नसती… आपल्या लहानग्यांना एक नवीन जीवन मिळावे म्हणून तीने स्वतःला चित्त्याच्या स्वाधीन केलं… स्वतःचा गळा त्याच्या तोंडात असताना आपली पिल्लं योग्य सुरक्षित स्थळी जावीत याची वाट बघत होती… असं जगात एकच व्यक्ती करू शकते ती फक्त आई!

मूळ पोस्ट – फेसुबकफेसबुकफेसुबक

तथ्य पडताळणी

जंगली प्राण्यांच्या फोटोंविषयी अशा भावनिक पण काल्पनिक कहाणी जोडून सोशल मीडियावर पसरविण्यात येतात. याआधीसुद्धा फॅक्ट क्रेसेंडोने अशा प्रकारचे दावे खोडून काढलेले आहेत. त्यामुळे या फोटोचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून कळाले की, व्हायरल होत असलेले दावे पूर्णतः निराधार आहेत. 

सर्वप्रथम फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हरणाची शिकार करणाऱ्या चित्त्यांचा मूळ फोटो Alison Buttigieg या वन्यजीव छायाचित्रकाराने काढला होता. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर या फोटोंमगील कहाणी त्यांनी सांगितलेली आहे.

मूळ लेख – Alison Buttigieg । अर्काइव्ह

अलिसन यांनी सप्टेंबर 2013 मध्ये केनियामधील मसई मारा येथे हा फोटो काढला होता. त्यांनी सांगितले की, मादा चित्ता तिच्या पिल्लांना शिकार कशी करायची हे शिकवित होती. पण ते पिल्ले हरणाला मारत कमी आणि त्याच्याशी खेळत जास्त होते. हे पाहून मग मादा चित्ता हरणाच्या गळ्याचा घोट घेत त्यांना शिकारीचे तंत्र शिकवले. या फोटोची खासियत म्हणजे चित्ते तिचे लचके तोडत होते तेव्हा हे हरीण स्थितप्रज्ञ असल्यासारखे एकटक बघत उभे होते. जणू काही भीती आणि धक्क्याने त्याचे प्राणच गोठून गेले. 

अलिसन यांनी कुठेही हरणाने आपल्या पिल्लांना वाचवण्यसाठी स्वतःचा जीव दिल्याचा उल्लेख केलेला नाही. तसेच हा फोटो पाहून त्याला खूप वाईट वाटले, डोळ्यात पाणी आले किंवा ती नैराश्यात गेली असे म्हटलेले नाही. त्यांच्या वेबसाईटवर या हरणाच्या शिकारीचे अनेक फोटो दिलेले आहेत. 

अधिक शोध घेतल्यावर आम्हाला अलिसन यांनी फोटो काढलेल्या शिकारीचा व्हिडिओसुद्धा मिळाला. तो तुम्ही खाली पाहू शकता. व्हिडिओच्या 1:02 मिनिटांपासून ही शिकार सुरू होते. 

विशेष म्हणजे या फोटोसोबतच अशी कहाणी गेल्या अनेक वर्षांपासून जोडली जात आहे. 2017 साली डीएनए वेबसाईट्शी बोलताना अलिसन यांनी व्हायरल होत असलेले दावे फेटाळून लावले होते.  

त्या म्हणाल्या की, “हा फोटो काढल्यानंतर मी नैराश्य वगैरे काही गेले नव्हते. सोशल मीडियावर लाईक मिळवण्यासाठी लोक अशा फेक गोष्ट तयार करतात. असे करून ती मूळ फोटो विनापरवानगी वापरतात. हे फार वाईट आहे. फोटोसोबतची बनावट कहाणी वाचून अनेक जणांनी मला माझ्या नैराश्यविषयी विचारपूस केली. काहींनी तर मी हरणाला का नाही वाचविले असेही विचारले. ही बनावट कहाणी कोणी तयार केली मला माहित नाही.”

मूळ पोस्ट – DNA । अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हरणाच्या शिकारीच्या या फोटोसोबत काल्पनिक कहाणी जोडून तो मेसेज फिरवला जात आहे. हा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरनेच खुलासा करीत सांगितले की, व्हायरल होत असलेला दावा असत्य आहे.

Avatar

Title:पिल्लांना चित्त्यापासून वाचविण्यासाठी या हरणाने स्वतःचा जीव गमावला का? वाचा या फोटोची खरी कहाणी

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False