राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या रडण्याच्या व्हिडिओला एडिट करून केले व्हायरल

False राजकीय | Political

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते शरद पवारांना त्रास होत असल्याचे पाहुन त्यांना दुःख झाल्याचे ते सांगतात. या व्हिडिओच्या शेवटी जितेंद्र आव्हाड कथितरीत्या ‘एवढं नाटक कोणी करू शकते का’ असे म्हणताताना ऐकू येतात. 

या व्हिडिओवरून दावा केला जात आहे की आव्हाड रडण्याचे नाटक करत होते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की सदरील व्हिडिओ एडिट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आव्हाड ते नाटक करत असल्याचे म्हटले नव्हते. 

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओत जितेंद्र आव्हाड पत्रकाराला बाईट देत आहेत. 

पत्रकार त्यांना विचारतो:  कालच्या घटनेने खूप दुःख झालं?

त्यावर रडवलेल्या आवाजात आव्हाड उत्तर देतात: साहेबांचा त्रास बघून त्रास होतो…राजकारण गेलं खड्ड्यात हो….काय राजकारणानी मिळालं.

मग शेवटी आव्हाड एक वाक्य म्हणाताना ऐकू येतात: एवढं नाटक दुसरं कोणी करू शकेल का?

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम तर हा व्हिडिओ कधीचा आहे हे शोधले. कीवर्ड्स सर्च केल्यावर युट्यूबवर 25 नोव्हेंबर 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आढळला. यात जितेंद्र आव्हाड शरद पवारांचा त्रास पाहून त्रास होत असल्याचे म्हणतात. यात ते कुठेही एवढं नाटक दुसरं कोणी करू शकेल का असे म्हणत नाहीत. 

हा व्हिडिओचा संदर्भ काय?

2019 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून 23 नोव्हेंबर 2019 रोजी गुपचूप शपथविधी केला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी बोलताना अजित पवारांच्या या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली होती.

एबीपी माझाशी बोलतानाही त्यांनी संवाद साधला होता. नीट पाहिले तर लक्षात येईल, की व्हायरल व्हिडिओत आव्हाडांनी घातलेला शर्ट आणि एबीपी माझाच्या ट्विटमधील शर्ट एकच आहे. 

शिवाय त्याच जागेवर आव्हाडांनी आणखी एक मुलाखतसुद्धा त्यावेळी दिली होती. ती तुम्ही येथे पाहू शकता.

मूळ पोस्ट – फेसबुक 

मग हे ‘नाटका’चे वाक्य आले कुठून?

2019 साली जितेंद्र आव्हाडांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते त्यांच्या मुंब्रा-कळवा मतदारसंघातील लोडशेडिंगबद्दल बोलत होते. या व्हिडिओची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ते म्हणाले होते की, “एवढं नाटक दुसरं कोण करू शकेल का? रिटेक न घेता”.

हा व्हिडिओ त्यावेळी प्रचंड चर्चेत आला होता. लोकमतने 4 डिसेंबर 2019 रोजी यावर बातमी केली होती. 

मूळ व्हिडिओ – फेसबुक

या व्हिडिओतील ते नाटकावाले वाक्य जितेंद्र आव्हाडांच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एडिट करताना टाकलेले आहे. खाली दिलेल्या तुलनात्मक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, जितेंद्र आव्हाडांच्या रडतानाच्या व्हिडिओला नाटकी ठरवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने एडिट करण्यात आलेला आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या रडण्याच्या व्हिडिओला एडिट करून केले व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False