चहामुळे कोरोना व्हायरस बरा किंवा नियंत्रणात ठेवता येत नाही. तो मेसेज खोटा. वाचा सत्य

Coronavirus False वैद्यकीय

कोरोनाची दहशत आता इतकी वाढली आहे की, लोक वाटेल तो उपाय करून पाहत आहेत. त्यात भर म्हणजे सोशल मीडियावर कोरोनावरील औषधपचारांची. आता काय म्हणे तर आपल्या घरातील चहामुळे कोरोना बरा होतो. चीनमधील संशोधकांना तसा शोध लागल्याचे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले जाते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व्हॉट्सअपवर पाठवून त्याची शहानीशा करण्याची विनंती केली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा मेसेज फेक असल्याचे स्पष्ट झाले. चहामुळे कोरोना बरा होत नाही. 

काय आहे पोस्टमध्ये?

Tea WhatsApp-1.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

CNN वृत्तवाहिनीचा हवाला देऊन हा मेसेज फिरवण्यात येत आहे. परंतु, CNN ने अशी कोणतीही बातमी दिलेली नाही.

शिवाय चीन सरकारला सर्वात आधी कोरोना व्हायरसबद्दल चेतावणी देणारे डॉ. ली वेनलियांग हे विषाणूंचे अभ्यासक नव्हते. ते नेत्ररोगतज्ज्ञ होते. त्यांनी विषाणूंविषयी कोणताही शोधप्रबंध लिहिला नव्हता. त्यांनी केवळ नव्या प्रकारचा रोग आल्याची भीती व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी चहाचा उपाय सुचविला नव्हता.

चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांना तीन वेळा चहा देत असल्याच्या विधानालादेखील पुरावा नाही. 

मग चहाचा हा उपाय आला कुठून?

चायनाडेली नावाच्या वेबसाईटने गेल्या महिन्यात एका संशोधनाचा हवाला देऊन चहा कोरोनाचे संक्रमण रोखण्यास प्रभावी ठरत असल्याची बातमी दिली होती. परंतु, याच बातमीत म्हटले की, ते संशोधन नंतर डिलीट करण्यात आले. म्हणजे चहाविषयीचा त्यातील दावादेखील खोटा ठरतो.

चहाचे सत्य काय आहे?

या मेसेजमधील दाव्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने पद्मश्री डॉ. शरद काळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी चहामुळे कोरोना बरा होत नसल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, “कोरोनाच्या संदर्भाने चहाबद्दल जी पोस्ट फिरत आहेत तिला कोणताही शास्त्रीय आधार नाही. चहामधील कॅफिन रसायनामुळे चहा पिल्यानंतर ताजेतवाने वाटते. साधारण 3 टक्के एव्हढे या कॅफिनचे प्रमाण असते. 400 मिलिग्राम एवढ्या प्रमाणात जर ते शरीरात पोहोचले तर ते आपल्याला तरतरी आणते. चहा पिण्याचा मुख्य उद्देश हाच असतो. त्यामुळे चहा प्यायला मनाई नाही; पण चहा हे कोरोनावरचे औषध मात्र नक्की नाही.”

डॉ. काळे भाभा अणुसंशोधन केंद्रामधील (निवृत्त) वैज्ञानिक  आहेत. त्यांनी सुमारे चार दशके सूक्ष्मजीवशास्त्र याविषयात संशोधन केलेले आहे.

चहातील रासायनिक गुणधर्माविषयी त्यांनी सांगितले की, “चहामधील मिथिलझंथिन (methylxanthines) शरीरातील कॅफिन उत्तेजित करते हे धादांत खोटे विधान आहे. त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. कॅफिन आणि थिओब्रोमीन (Theobromine) हे दोन घटक मिथिलझंथिन नावाच्या अल्कलॉइड्स गटातील आहेत. यातील थिओब्रोमीन या घटकामुळे लघवी थोडी अधिक होते आणि रक्तवाहिन्या रुंद होऊ शकतात. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते. चहामध्ये या थिओब्रोमीन चे प्रमाण कॉफी आणि कोको मधील प्रमाणापेक्षा खूपच कमी असते. थिएनिन (Theanine) नावाचे एक अमिनो आम्ल चहामध्ये असते. मेंदूमध्ये ज्या अल्फा तरंग निघतात त्या मेंदूला उत्तेजित करतात. हे तरंग ज्या अनेक कारणांनी निघू शकतात त्यात थिएनिन हे एक कारण असू शकते. यावरून असे लक्षात येईल की, चहा हे तसे निरुपद्रवी पेय असून, थोडे उत्साहित करू शकते; पण रोगावरचे औषध मात्र नसते. कोरोनावरचे तर नाहीच नाही.”

याचाच अर्थ की, चहापिल्याने कोरोना बरा होतो हा गैरसमज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूवर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसल्याचे सांगितलेले आहे. कोरोना विषाणूपासून होणारा कोविड-19 या महारोगाला रोखणारे किंवा त्याला बरे करणारे कोणतेही औषध किंवा लस अद्याप उपलब्ध नाही, असे WHO ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे घरगुती उपाय किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार न करण्याचे आवाहन WHO  ने केले आहे.

WHo-1.png

सविस्तर येथे वाचा – WHO

डॉ. शरद काळे यांनीदेखील सोशल मीडियावरील फिरणाऱ्या संदेशांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “साथीच्या रोगात माणसाची सारासार विचार करण्याची प्रवृत्ती कमी होते, असे म्हणतात. त्याचे मुख्य कारण तो घाबरलेला असतो. या घाबरलेल्या स्थितीत मनाला बरे वाटेल अशा कोणत्याही गोष्टीवर खरेखोटे पडताळून न पाहता तो चटकन विश्वास ठेवतो. व्हाट्सअपच्या पोस्ट वाचतांना वाचकांनीच त्या खऱ्या असतीलच असे गृहीत धरू नये.”

कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर किंवा साबणाने नियमित हात धुण्याची काळजी घ्यावी. कोरोनावर जगभरात संशोधन सुरू असून, त्यावरील लस तयार झाल्यावर आपल्या सर्वांनाच याची अधिकृत माहिती मिळेल.

निष्कर्ष

चहामुळे कोरोना बरा होत नाही. कोविड-19 या महारोगावर चहाचा उपाय नाही. तसे सांगणारा मेसेज खोटा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. चहा केवळ तरतरी आणण्याचे काम करतो.

Avatar

Title:चहामुळे कोरोना व्हायरस बरा किंवा नियंत्रणात ठेवता येत नाही. तो मेसेज खोटा. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False