आमिर खान व तुर्कस्थानच्या राष्ट्रपतींचा जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल. वाचा सत्य

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावर तुर्कस्थानचे अध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानची बाजू घेतली होती. यानंतर नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्थानचा नियोजित दौरा रद्द केला होता. त्यानंतरही एर्दोगान यांनी 14 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या संसदेला संबोधित करताना कलम 370 हटविण्यासंबंधी पाकिस्तानसोबत उभे राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

असे असतानाही आमिर खानने नुकतीच एर्दोगान यांची भेट घेतली असा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर दोहोंचा एकत्रित फोटोदेखील शेयर होत आहे. यावरून आमिर खानच्या आगामी चित्रपटावर बंदी घालण्याचे आवाहन सोशल मीडिया युजर्स करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत आमिर खानविषयी करण्यात येणारा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टकर्ते म्हणत आहेत की, आमिर खान नुकताच तुर्कीच्या राष्ट्राध्याक्षाला भेटला हे तेच तुर्की आहे जे भारतावर हल्ला करायला पाकड्यांना मदत करतंय. करिना कपूर च्या नवर्‍याला शिवाजी महाराज यांचा इतिहास खरा वाटत नाही व देश रहायला सुरक्षित वाटत नाही. यांचा कोणता तरी चड्डा येतोय तो पहायचा आहे किंवा नाही आपापला प्रश्न आहे पण हे असेच आपल्या मातृभूमीला नावं ठेवणार असतील तर विचार करायला हवा.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

आमिर खानने खरंच एर्दोगान यांची अलिकडे भेट घेतली का यासंबंधी नेटवर शोध घेतला असता कळाले की, आमिर व एर्दोगान यांचा हा फोटो दोन वर्षांपूर्वीचा म्हणजेच 2017 मधील आहे.

आमिर खान ऑक्टोबर 2017 मध्ये तुर्कस्थानला गेला होता. त्याने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली होती. “इस्तानबुल जाणाऱ्या विमानात बसलोय. तुर्कस्थान दौऱ्याविषयी मी कमालीचा उत्साहित आहे,” असे आमिरने 4 ऑक्टोबर 2017 रोजी ट्विट केले होते.

अर्काइव्ह

या दौऱ्यामध्ये आमिर खानने तुर्कस्थानचे अध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगान यांची भेट घेतली होती. खुद्द तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरून या भेटीची माहिती आणि फोटो शेयर करण्यात आला होता. “राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी राष्ट्रपती कॉम्प्लेक्स येथे भारतीय अभिनेता आमिर खान यांची भेट घेतली,” असे 7 ऑक्टोबर 2017 रोजीच्या ट्विटमध्ये लिहिलेले आहे.

अर्काइव्ह

याचा अर्थ की, आमिर व एर्दोगान यांचा हा फोटो 2017 मधील आहे. आमिरने अलिकडे तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षाची भेट घेतल्याची कुठेही वृत्त नाही.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, आमिर खान व एर्दोगान यांचा दोन वर्षे जुना फोटो शेयर करून चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम 370 रद्द केले होते. त्यानंतर एर्दोगान यांनी भारताविरोधी भूमिका घेतली होती. त्याचा आणि या फोटोचा काही संबंध नाही.

Avatar

Title:आमिर खान व तुर्कस्थानच्या राष्ट्रपतींचा जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •