
जपानमध्ये असणाऱ्या एका भारतीय डॉक्टरने कोरोनाची लक्षणे आणि उपायांबाबत केलेल्या मार्गदर्शनाचा एक कथित व्हिडियो व्हायरल होत आहे. व्हिडियोतील व्यक्ती कोरोनाची बाधा झाली की नाही हे तपासण्याचे तीन लक्षणे सांगते. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी पाच उपायदेखील सुचवते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची पडताळणी करण्याची विनंती केली.
तथ्य पडताळणीअंती या व्हिडियोतील अनेक दावे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले.
काय आहे व्हिडियोमध्ये?
या व्हिडियोमध्ये पुढीलप्रमाणे दावे करण्यात आले आहेत.
कोरोनाची तीन लक्षणेः
1. कोरोनाची बाधा झाल्यावर 102 डिग्रीपेक्षा जास्त ताप येतो. जर आपल्याला ताप नसेल तर कोरोना नाही असे समजावे.
2. कोरोनाची बाधा झाल्यास आधी ताप येतो व पाच दिवसांनंतर कोरडा खोकला सुरू होतो. कोरोनामुळे खोकतेवेळी संपूर्ण शरीरात वेदना होतात. त्यामुळे तुम्हाला जर दिवसभर कफ असणारा खोकला असेल तर कोरोना नाही असे समाजावे.
3. कोरोनाबाधित रुग्ण 10 सेंकदसुद्धा श्वास रोखू शकत नाही. तुम्ही जर 10 सेकंदांपेक्षा जास्त श्वास रोखू शकले तर तुम्हाला कोरोना नाही.
कोरोनापासून बचावाचे पाच उपाय
1. दिवसातून तीन वेळा कोमट पाणी पिणे
2. दुधात हळत टाकून पिणे
3. खजुर खाणे
4. कलौजी खाणे
5. सोशल मीडियापासून दूर राहणे
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सदरील व्हिडियोतील व्यक्तीचे नाव, जपानमध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आहेत, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच हा व्हिडियो इतर नावानेदेखील शेयर केलेला आहे. त्यामुळे जपानमधील भारतीय डॉक्टर, असे केवळ व्हिडियोला महत्त्व प्राप्त व्हावे म्हणून म्हटलेले असावे.
जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेतील आरोग्य आणि मानसिक रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने (सीडीसी) कोरोनाची लक्षणे आणि बचावात्मक उपाय सांगितलेले आहेत. सदरील व्हिडियोतील केलेले अनेक दावे या दोन्ही संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीशी मेळ घात नाहीत.
दावा: ताप नसेल तर कोरोना नाही असे समजावे.
WHO नुसार, कोरोनाबाधितामध्ये खोकला, ताप आणि श्वासोच्छवासाच्या अडचणी ही तीन लक्षणे सामान्यतः आढळून येतात. तसेच अनेक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसतानादेखील (Asymptomatic) कोरोनाची लागण झाल्याचे आढळलेले आहे. सीडीसीच्या आकडेवारीनुसार, 35 टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे दिसून येत नाहीत.
त्यामुळे ताप नसला म्हणजे कोरोना नाही असे सरधोपटपणे म्हणता येत नाही.
दावाः कोरोनाबाधितांना कोरडा खोकला असतो
हे खरं आहे की, 60 टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोरडा खोकल्याचे लक्षण आढळून येते. श्वसननिलकेमध्ये सूज किंवा संसर्ग झाल्यामुळे कोरडा खोकला उद्भवतो. म्हणून सतत कोरडा खोकला येत असेल तर नक्कीच डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्यावे.
दावाः तुम्ही जर 10 सेकंदांपेक्षा जास्त श्वास रोखू शकले तर तुम्हाला कोरोना नाही.
दहा सेकंदांपेक्षा जास्त श्वास रोखू न शकणे, हे कोरोनाची लक्षण नाही. अनेक तज्ज्ञांनी हे खोटं असल्याचे सांगितले आहे. सर्वप्रथम अमेरिकेत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या नावे या दाव्यासह हा खोटा मेसेज व्हायरल झाला होता. परंतु, विद्यापीठाने लगेच खुलासा केला की, हे खोटं आहे.
केंद्र सरकारच्या पत्र व सूचना मंत्रालयानेदेखील दहा सेकंद श्वास रोखून धरण्याची टेस्ट खोटी असल्याचे सांगितले आहे.
सीएनएनने देखील कोरोनाविषयक विविध खोट्या दाव्यांचे सत्य सांगितले आहे. त्यातही बेयलर कॉलेज ऑफ मेडिसिनचे डॉ. रॉबर्ट अटमार यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले होते.
सदरील व्हिडियोमध्ये कोरोनापासून बचाव होण्यासाठीचे जे उपाय सांगितले आहेत तेदेखील असत्य आहेत. कोमट पाणी, हळदीचे दूध, खजुर हे सर्व खाणे चांगले जरी असले तरी त्यामुळे कोरोनाची लागण होणार नाही असा दावा करता येत नाही.
कोरोनापासून बचावासाठी साबण किंवा सॅनिटायझरने हात धुणे, मास्क लावणे, चेहऱ्याला सतत हात न लावणे, सुरक्षित तीन मीटरचे अंतर राखमे, गर्दी टाळणे, तब्येत ठीक नसल्यास घरीच आराम करणे हे उपाय आहेत.
निष्कर्ष
यावरून हे स्पष्ट होते की, व्हिडियोमध्ये सांगितली जाणारी माहिती पूर्णतःसत्य नाही. कोरोनाची लक्षणे आणि उपाय केवळ अधिकृत यंत्रणेकडूनच जाणून घ्यावे. संपूर्ण व्हिडियोतील शंभर टक्के योग्य बाब म्हणजे सोशल मीडियापासून दूर राहणे. त्यामुळे व्हायरल व्हिडियोवर विश्वास ठेवून ते पुढे फॉरवर्ड केले जाणार नाहीत.

Title:जपानी डॉक्टरच्या नावे कोरोनाबाबत असत्य माहिती सांगणारा व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
