उत्पादनावरील बारकोड 890 पासून सुरू होत असेल तर ते प्रोडक्ट ‘मेड इन इंडिया’ असते का? वाचा सत्य

Partly False सामाजिक

पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारताचा’ मंत्र दिल्यानंतर सोशल मीडियावर स्वदेशी उत्पादनेच खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. कोणते उत्पादन स्वदेशी म्हणजेच ‘मेड इन इंडिया’ हे ओळखण्याची युक्ती एका व्हायरल मेसेजमध्ये सांगितली जात आहे. 

उत्पादनावरील बारकोड क्रमांक जर 890 ने सुरू होत असेल तर ते प्रोडक्ट स्वदेशी असते, असा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता या मेसेजमधील माहिती भ्रामक असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

barcodes.png

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

GS1 ही संस्था जगभरातील कंपन्यांन्यांच्या उत्पादनांना बारकोड क्रमांक प्रदान करते. त्याला युरोपियन आर्टिकल नंबर (EAN)  किंवा युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड (UPC) असे म्हणतात. 

संस्थेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, प्रत्येक देशासाठी तीन आकडी कोड ठरविण्यात आला आहे. त्याला कंपनी प्रीफिक्स म्हणतात. भारताचा कोड/प्रीफिक्स 890 आहे. 

याठिकाणी हेदेखील स्पष्ट केले आहे की, उत्पादनावरील प्रीफिक्सवरून (बारकोडचे पहिले 3 आकडे) त्या उत्पादनांची निर्मिती कोणत्या देशात झाली हे सांगता येत नाही.

Barcode-1.png

मूळ वेबसाईटला भेट द्या – GS1

GS1 संस्थेच्या वेबसाईटवर FAQ मध्ये स्पष्ट केले आहे की, बारकोडवरील पहिल्या तीन क्रमांकावरून उत्पादन कोणत्या देशात तयार करण्यात आले ते निर्देशित होत नाही. 

कंपनी प्रीफिक्स केवळ कोणत्या देशातून संस्थेकडे नोंदणी करण्यात आली हे कळते. म्हणजे 890 कोड मिळवलेली कंपनी कोणत्याही देशातून उत्पादन तयार करू शकते. 

थोडक्यात काय तर, 890 कोडचा अर्थ ते उत्पादन भारतातच तयार झाले असेल याची खात्री नाही. 890 हा कोड केवळ कंपनीची मालकी भारतीय नोंदणीकृत असल्याचे कळते.

Prefix.png

मूळ वेबसाईटला भेट द्या – GS1 FAQGS1 Myth

बारकोड प्रीफिक्सबद्दल यापूर्वी अनेक वेळा भ्रम पसरविण्यात आलेला आहे. कंपनीने वेळोवेळी याविषयी खुलासा केलेला आहे. प्रीफिक्सवरून उत्पादनांची निर्मिती कोणत्या देशात झाली हे कळत नाही. 

बारकोड इंडिया वेबसाईटनेदेखील याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, 890 पासुन सुरू होणारा बारकोड असेल म्हणजे ते उत्पादन भारतातून किंवा भारतीय कंपनीने तयार केले असा अर्थ होत नाही. 

Bard.png

मूळ लेख येथे वाचा – बारकोड इंडिया 

अमेरिकेतीही अशा अर्थाचा मेसेज फिरू लागल्यानंतर GS1 संस्थेचे वरीष्ठ संचालक शॅनन सुलिवॅन यांनी बारकोडवरील प्रीफिक्सविषयी केल्या जाणाऱ्या दाव्यांविषयी रॉयटर्स आणि एएफपीला सांगितले की, ही माहिती चुकीची आहे. प्रीफिक्सवरून उत्पादन कोणत्या देशात तयार झाले हे सांगता येत नाही.

म्हणजे अमेरिकन कंपनीच्या भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांवर 890 कोड नसेल. त्याच्यावर अमेरिकेचा कोड असेल. 

मग मेड इन इंडिया कसे ओळखायचे?

उत्पादनावर मेड इन इंडिया लिहिले असेल तर ते उत्पादन भारतात तयार झाले असे समजावे. भारतीय कंपनीचे उत्पादन आणि भारतात तायर झालेले उत्पादन यात फरक आहे. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, बारकोडवरील पहिल्या तीन आकड्यांवरून उत्पादन कुठे तयार झाले हे कळत नाही. म्हणजे बारकोडवरील पहिले तीन आकडे 890 असतील तर ते उत्पादन “मेड इन इंडिया” असेलच हे खात्रीलायक सांगता येत नाही. 890 कोड भारताचा असला तरी त्याचा ती कंपनी दुसऱ्या देशातूनही उत्पादन तयार करून शकते. त्यामुळे व्हायरल मेसेजमधील संदेश भ्रामक आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.) 

Avatar

Title:उत्पादनावरील बारकोड 890 पासून सुरू होत असेल तर ते प्रोडक्ट ‘मेड इन इंडिया’ असते का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Partly False