Fact Check : जीवंत नीलगाय गाडण्याच्या या क्रुर घटनेत आमदार राज किशोर सिंह यांचा सहभाग होता का?

False राजकीय | Political

आमदार राजकिशोर सिंह यांनी जीवंत नीलगाय जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात गाडल्याची माहिती Nikhil Gade यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. किती क्रुर लोकं आहेत ते वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत कारवाई करण्यात आली पाहिजे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी

जीवंत नीलगाय गाडण्याची ही घटना खरोखरच घडली आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हिंदी भाषेत ‘जिन्दा नीलगाय को जेसीबी द्वारा गड्ढा खुदवा कर दफ़न कर दिया’ असा शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या परिणामात आम्हाला नवभारत टाईम्स या हिंदी दैनिकाच्या संकेतस्थळावरील खालील वृत्त दिसून आले. या वृत्तातुन हे स्पष्ट झाले की, बिहारमधील वैशाली येथे नीलगाय जीवंत गाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. भगवानपूर ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या असून त्यात वनविभागावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

NAVBHARAT TIMES | ARCHIVE

‘द टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळानेही या घटनेचे वृत्त दिले आहे. या वृत्तात आम्हाला आमदार राज किशोर सिंह यांचे नाव कुठेही दिसून आले नाही.

TIMES OF INDIA | ARCHIVE 

या घटनेचे गांभीर्य आणि क्रुरता लक्षात घेऊन आम्ही वनाधिकारी भारत भुषण पाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, नीलगायींची शिकार करण्याचे आदेश आम्ही दिले होते. त्यानंतर नीलगायींच्या मृतदेहांचे व्यवस्थित दफन करण्यास आम्ही सांगितले होते. या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे त्याचा तपास केला जाईल. प्रथमदर्शनी या प्रकरणात आमदारांची कोणतीही भूमिका असल्याचे दिसत नाही.

वैशाली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मानवजितसिंग ढिल्लन यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्या तपासात यात आमदारांची कोणतीही भूमिका असल्याचे दिसून आलेले नाही. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांविरुध्द चौकशी सुरु आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी आम्ही आमदार राज किशोर सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, अशा प्रकारे माझ्याबाबत खोटी माहिती व्हायरल होत आहे. ही घटना कुठे घडली आहे याबाबत मला माहिती नाही. चुकीची माहिती पसरविण्याऱ्यांविरोधी कायदेशीर कारवाई करणार आहे. काही माध्यमांकडूनही चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. आपली बदनामी होत असल्याने त्याविरोधातही दाद मागू.

निष्कर्ष

जीवंत नीलगाय गाडण्यात आल्याची घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडली आहे. या घटनेशी आमदार राज किशोर सिंह यांचा संबंध असल्याचे मात्र दिसून आलेले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : जीवंत नीलगाय गाडण्याच्या या क्रुर घटनेत आमदार राज किशोर सिंह यांचा सहभाग होता का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False