ACCIDENTAL FACT : निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या अपघाताच्या खोट्या बातम्या व्हायरल

False राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना निवडणुक प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्लीन चीट न देणारे निवडणूक आयुक्त अशोक लवासा मध्यंतरी चर्चेत आले होते. या लवासा यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर सध्या पोस्ट फिरत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या अपघाताच्या वृत्तावरून विविध कयास बांधले जात आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये

पोस्टमध्ये अशोक लवासा यांचा अपघात झाल्याचे म्हटले आहे. त्यामागे घातपात आणि कटाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या गाजत असलेल्या ईव्हीएमविषयी असणाऱ्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर ही अपघाताची बातमी भुवया उंचावणारी आहे.

तथ्य पडताळणी

अशोक लवासा हे 1980 च्या बॅचचे निवृत्त अधिकारी आहेत. सध्या ते भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते अर्थसचिव, पर्यावरण व वन सचिव, नागरी उड्डायन सचिव राहिलेले आहेत. सर्वप्रथम असा काही अपघात झाला का याचा इंटरनेटवर शोध घेतला. तेव्हा अशी कोणतीही बातमी आढळली नाही. निवडणूक आयुक्तपदावरील अधिकाऱ्याचा अपघात झाला असता तर ही मोठी बातमी ठरली होती. परंतु, तसे काहीच समोर आले नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट अशोक लवासा यांच्या निवडणूक आयोगातील कार्यालयाशी संपर्क केला. तेथील प्रतिनिधीने लवासा यांच्या अपघाताचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले. त्यांचा अपघात झालेला नसून, सोशल मीडियावरील पोस्टमध्ये चुकीची माहिती पसरविली जात आहेत, असे ते म्हणाले. यावरून लवासा यांचा अपघात झाला नाही, हे स्पष्ट होते.

अशोक लवासा चर्चेत का आहेत?

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आचारसंहितेचे केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि लावासा यांनी सुनावणी केली होती. यामध्ये लवासा यांनी मोदी-शहांना क्लीन चीट देण्याविरोधात मत दिले होते. परंतु, अंतिम आदेशात क्लीन चीट देताना लावासा यांच्या मताचा उल्लेख करण्यात आला नव्हता. यामुळे नाराज झालेल्या लवासा यांनी सुनील अरोरा यांना पत्र पाठवून आक्षेप नोंदवला होता. त्यांनी आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होऊ नये, यासाठी दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

लोकसत्ताच्या बातमीनुसार, एखाद्या प्रकरणात आयोगातील तीन आयुक्तांपैकी जर एका आयुक्ताचे मत हे अन्य दोन सदस्यांपेक्षा वेगळे असेल तर आदेशामध्ये तशी नोंद झालीच पाहिजे. लवासा यांनी यासाठी सुप्रीम कोर्टाचा दाखला दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात ज्या पद्धतीने प्रत्येक न्यायाधीशाच्या मताचा उल्लेख केला जातो, तशीच पद्धत निवडणूक आयोगानेही अवलंबली पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.

निवडणूक आयोगातील मतभेद मीडियात गाजू लागल्यावर सुनील अरोरा यांनी पत्रक काढून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘मतभेद होणे सामान्य बाब असून पूर्वीदेखील आयुक्तांमध्ये मतभेद झालेले आहेत. परंतु, ते सार्वजनिकपणे व्यक्त करणे संयुक्तिक नाही, असे ते म्हणाले होते.

अर्काइव्ह

निष्कर्ष

अशोक लवासा यांचा अपघात झालेला नाही. त्यांच्या कार्यालयाने अशा खोडसाळ वृत्ताचे खंडन केले आहे. त्यामुळे असा दावा करणाऱ्या पोस्ट खोट्या आहेत.

Avatar

Title:ACCIDENTAL FACT : निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या अपघाताच्या खोट्या बातम्या व्हायरल

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False