तथ्य पडताळणीः हे कार्टून खरंच अमेरिकेतील व्यंगचित्रकाराने काढले आहे का?

False राष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावर सध्या काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर टीका करणारे एक व्यंगचित्र (कार्टून) व्हायरल होत आहे. हे कार्टून अमेरिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार बेन हॅरिसन यांनी काढल्याचा दावा केला जातोय. हे व्यंगचित्र तुम्ही खाली दिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये पाहू शकता. फॅक्ट क्रेसेंडोने संबंधित व्यंगचित्राची सत्यता तपासली आहे.

अर्काइव्ह

फेसबुक पोस्टमधील व्यंगचित्रामध्ये एक गाय भारताच्या नकाशाच्या आकाराचे पान खात असून, गांधी घराण्याला दूध तर, जनतेला शेण देत असल्याचे दाखविण्यात आले आहे. काँग्रेसने देशावर कशाप्रकारे राज्य केले याचे अचूक वर्णन करणारे हे व्यंगचित्र अमेरिकन कार्टूनिस्ट बेन गॅरिसन यांनी काढले, असा दावा केला जात आहे.

तथ्य पडताळणी

व्यंगचित्राचे निरीक्षण केल्यास लक्षात येते की, व्यंगचित्राखाली कलाकाराची स्वाक्षरी नाही. सामान्यतः व्यंगचित्राखाली कलाकाराची स्वाक्षरी असते.

गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हे व्यंगचित्र मागच्या दोन-तीन वर्षांपासून विविध कारणांसाठी वापरण्यात येत असल्याचे समोर आले. मजुरा (जि. सुरत, गुजरात) येथील भाजपचे आमदार हर्ष सांघवी यांनीदेखील हेच व्यंगचित्र 20 ऑक्टोबर 2017 साली ट्विट केले होते.

अर्काइव्ह

त्याखालील कमेंटमध्ये एकाने बेन गॅरिसन यांनी यासंबंधी खुलासा केल्याचे म्हटले आहे. त्याचा शोध घेतल्यावर आम्हाला त्यांचे दोन ट्विट आढळले. 22 ऑक्टोबर 2017 रोजीच्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मी भारतीय राजकारणाविषयी कधीच व्यंगचित्र काढलेले नाही. माझ्या नावाने तसे कार्टून पसरविले जात आहेत. परंतु, ते माझे नाही.

अर्काइव्ह

31 ऑक्टोबर 2017 रोजीच्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हटले की, माझ्या व्यंगचित्रांची शैली अशी नाही. मी भारतीय राजकारणावर व्यंग करीत नाही.

अर्काइव्ह

यावरून हे सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले व्यंगचित्र बेन गॅरिसन यांनी काढलेले नाही. मग ते कोणी काढले?

गुगल रिव्हर्स इमेज सर्चमध्ये रेडिट या वेबसाईटवर 20 डिसेंबर 2016 रोजी अपलोड करण्यात आलेल्या एका थ्रेडमध्ये वरील कार्टूनशी साम्य असलेले व्यंगचित्र आढळले. रेडिटवरील व्यंगचित्रामध्ये मेक इन इंडिया या योजनेवर टीका करण्यात आलेली आहे. मेक इन इंडियामुळे केवळ परदेशी गुंतवणुकदारांचा फायदा होत आहे. देशाची जनतेचे कोणतेही हित साध्य होत नसल्याची टीका या कार्टूनमध्ये करण्यात आली आहे. हेच व्यंगचित्र IMGUR वेबसाईटवर 1 ऑक्टोबर 2015 पासून उपलब्ध आहे.

मूळ छायाचित्र येथे पाहा – रेडिटअर्काइव्ह

या व्यंगचित्राखाली कलाकाराचे नाव – Amal Medhi –  दिलेले आहे.

त्यांच्या फेसबुक प्रोफाईलनुसार अमल हे आसाममधील गोलपाडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या फेसबुकवर आम्हाला मूळ 29 सप्टेंबर 2015 रोजी अपलोड केलेले व्यंगचित्र सापडले.

अर्काइव्ह

अमल यांचे मूळ व्यंगचित्र आणि फेसबुकवरील व्हायरल व्यंगचित्र यांचे तुलना करून पाहू. मूळ कार्टूनमधील मेक इन इंडियाच्या जागी काँग्रेस पक्षाचे चिन्ह लावून या व्यंगचित्राला एडिट करण्यात आले आहे. तसेच ते बेन गॅरिसन यांनी काढलेले नाही.

निष्कर्ष

काँग्रेसवर टीका करणारे व्यंगचित्र अमेरिकतील कलाकार बेन गॅरिसन यांनी काढलेले नाही. आसाममधील व्यंगचित्रकार अमल मेढी यांनी 2015 साली काढलेल्या कार्टूनला एडिट करून ते तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या फेसबुक पोस्टमधील दावा असत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः हे कार्टून खरंच अमेरिकतील व्यंगचित्रकाराने काढले आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •