मॉक ड्रिलचा व्हिडिओ अहमदनगरमध्ये बँक चोरांना रंगेहाथ पकडतानाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

बँकेतून पळून जाणाऱ्या तरुणांना पोलिस दबा धरून पकडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, अहमदनगर येथील बँकेत दरोडा टाकणाऱ्या सशस्त्र दरोडेखोरांना पोलिसांनी असे रंगेहाथ पकडले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. ही केवळ मॉक ड्रिल होती.

काय आहे दावा?

मास्कधारी तरुणांच्या पोलिस मुसक्या आवळतानाचा व्हिडिओ शेअर करून म्हटले की, “अहमदनगर येथील बँकेत दरोडा टाकणाऱ्या सशस्त्र दरोडेखोरांना पोलिसांनी असे पकडले.”

मूळ व्हिडिओ – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर, महाराष्ट्र टाईम्सच्या युट्यूब चॅनेलवर याच कारईवाईचा व्हिडिओ आढळला. सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ अमहदनगर पोलिसांनी घेतलेल्या मॉक ड्रिलचा आहे.

अहमदनगर तालुक्यातील शेंडी गावात ग्रामसुरक्षा दलाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते. त्यानुसार बँकेत दरोडा पडल्यावर कशी कारवाई करायची याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला होता.

फॅक्ट क्रेसेंडोने मग अहमदनगरचे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक अनिल काटके यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीदेखील व्हायरल व्हिडिओ केवळ मॉक ड्रिल होती, अशी माहिती दिली. 

ते म्हणाले की, 31 ऑगस्ट रोजी अहमदनगर पोलिसांनी शेंडी गावातील बँकेत ही मॉक ड्रिल केली होती. ती काही खरीखुरी कारवाई नव्हती. गावातील विविध ठिकाणांची सुरक्षव्यवस्था कशी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी हे प्रात्याक्षिक घेण्यात आले होते.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडिओ खऱ्या बँक दरोडखोरांना पकडतानाचा नाही. अहमदनगर पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

Avatar

Title:मॉक ड्रिलचा व्हिडिओ अहमदनगरमध्ये बँक चोरांना रंगेहाथ पकडतानाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False