
मुंबईला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. रस्त्यावर तर आहेच; परंतु, घरातही पाणी साचले आहे. अशा परिस्थितीमध्ये पाणीखाली बुडालेल्या एका गटारातून मुलाला वाचवितानाचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईतील मोहम्मद अली रोडी येथे घडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो कराची, पाकिस्तान येथील असल्याचे समोर आले.
काय आहे पोस्टमध्ये?

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हा व्हिडियो नेमका कुठला आहे हे तपासण्यासाठी की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून गेल्या महिन्यात फेसबुकवर हाच व्हिडियो पाकिस्तानच्या कराची शहरातील म्हणून अनेक पाकिस्तानी पेजेसने शेयर केला होता. तसेच युट्युबवरदेखील या घटनेचा थोडा मोठा व्हिडियो आढळला. यामध्ये हा व्हिडियो कराचीमधील बनारस चौकातील असल्याचे म्हटले आहे.
हा धागा पकडून शोध घेतला असता पाकिस्तानातील विविध न्यूज वेबसाईटने याबद्दल बातमी केल्याचे आढळले. रिपोर्ट सेंटर, स्टेटव्यूह, आणि जंग न्यूज़ वेबसाईटवरील बातमीनुसार, कराची शहरात 27-28 जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला होता. शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचले होते. शहरातील औरंगी टाऊन परिसरातील उड्डाणपुला शेजारील बनारस चौक भागात एका मुलगा उघड्या गटारात पडला. आसपासच्या लोकांनी तत्परता दाखवून या मुलाला बुडण्यापासून वाचविले. दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर हा मुलगा आता सुखरुप आहे.
निष्कर्ष
यावरून हे स्पष्ट होते की, कराचीमधील गटारात पडलेल्या मुलाला वाचविण्याचा व्हिडियो खोडसाळ पद्धतीने मुंबईतील म्हणून पसरविला जात आहे.

Title:पाकिस्तानमध्ये गटारात बुडालेल्या मुलाला वाचविण्याचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
