FACT CHECK: जगातील सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 मोदींनी लाँच केला होता का?

False राजकीय

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून ‘फ्रीडम 251’ हा मोबाईल 2016 साली प्रचंड गाजला होता. नोएडास्थित रिंगिंग बेल्स नावाच्या कंपनीने केवळ 251 रुपयांमध्ये तो उपलब्ध करून एकच खळबळ उडवून दिली होती. परंतु, नंतर या कंपनीविषयी अनेक तक्रारी आणि फसवणुकीचे प्रकार समोर आले आणि काही हजार फोन्सच्या वितरणानंतर ती बंद पडली.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर या फोनचा विषय पुन्हा एकदा गाजू लागला आहे. दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा फोन लाँच केला होता. परंतु, कंपनी बंद पडल्याने नोंदणी केलेल्या अनेकांचे पैसे बुडाले. फॅक्ट क्रेसेंडो या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये म्हटले की, ‘नरेंद्र मोदींनी लाँच केलेला फ्रीडम 251 हा स्मार्टफोन कोणाला आठवतो का? त्याच्या बुकिंगच्या पैशाचं काय झालं?

तथ्य पडताळणी

नोएडा येथील रिंगिंग बेल्स नावाच्या कंपनीने 18 फेब्रुवारी 2016 रोजी फ्रीडम 251 हा केवळ अडीचशे रुपये किमतीचा फोन बाजारात आणला होता. एवढ्या कमी पैशामध्ये या फोनमध्ये अँड्रॉइड ५.१, थ्रीजी, एक जीबी रॅम, चार इंचाची स्क्रीन, आठ जीबीची इंटर्नल मेमरी आणि क्वालकॉमचा १.३ गीगाहर्टझचा क्वाडकोर प्रोसेसर अशा सुविधा देण्यात आल्या होत्या.

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम या फोनच्या लाँचिग सोहळ्याविषयी माहिती घेतली. इंडियन एक्सप्रेस आणि झी न्यूजच्या बातमीनुसार, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते हा फोन लाँच करण्यात आला होता. यावेळी भाजपचे मध्य प्रदेशमधील खासदार ओम प्रकाश सकलेचा उपस्थित होते.

कार्यक्रम पत्रिकेनुसार, तत्कालिन संरक्षण मंत्री मोहन पर्रीकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. परंतु, कॅबिनेट मीटिंगमुळे ते येऊ शकले नाही, असे आयोजकांनी सांगितले.

मूळ बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेसझी न्यूजअर्काइव्ह

या सोहळ्याचा संपूर्ण व्हिडियो तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.

मग या रिंगिगं बेल्स आणि भारत सरकारचा काही संबंध आहे का?

कंपनीने लाँच सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेते म्हटले होते की, स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया अशा योजनांचा लाभ घेत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहोत. यामध्ये कुठेही भारत सरकारचा कंपनीत थेट सहभाग होता असे म्हटलेले नाही.

मूळ बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेसअर्काइव्ह

रिंगिगं बेल्स कंपनीचे अध्यक्ष अशोक चढ्ढा यांनीदेखील स्वतः स्पष्ट सांगितले होते की, कंपनीच्या फ्रीडम 251 या प्रकल्पामध्ये भारत सरकारचा कोणताही सहभाग नाही. तसेच कंपनीला सरकारकडून कोणत्याही सवलती मिळालेल्या नाहीत. मुरली मनोहर जोशी यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले आहे. केवळ मैत्रीखातर ते या सोहळ्याला उपस्थित होते.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्हीअर्काइव्ह

विशेष म्हणजे भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनी या कंपनीविरोधात मोहिम सुरू केली होती. फ्रीडम 251 स्मार्टफोनच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करीत त्यांनी कंपनीच्या विश्वासर्हतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंपनीची सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तपासण्याचा केंद्र सरकारने आदेश दिल्याचेही ते म्हणाले होते.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

या संदर्भात त्यांनी 18 फेब्रुवारी ट्विटदेखील केले होते. त्यांनी लिहिले की, फ्रीडम 251 प्रकल्पाला भारत सरकारतर्फे कोणतीही सवलत, नोंदणी आणि मानांकन मिळालेले नाही. रिंगिगं बेल्स ही कंपनीच मूळात पाच महिन्यांपूर्वी (16 सप्टेंबर, 2015) स्थापन करण्यात आली. हे ट्विट तुम्ही खाली पाहू शकता.

अर्काइव्ह

यावरून हे सिद्ध होते की, भारत सरकार किंवा नरेंद्र मोदी यांचा फ्रीडम 251 या स्मार्टफोन स्कीमशी काहीही संबंध नव्हता. रिंगिंग बेल्स या खासगी कंपनीचे ते उत्पादन होते. लाँचिंग सोहळ्यानंतर लगेच ही कंपनी सरकारी यंत्रणांच्या रडारवर आली होती.

  • लाँचिंगच्या दुसऱ्याच दिवशी कंपनीच्या नोएडा येथील कार्यालयात प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी तपासणी केली (संदर्भः लाईव्हमिंट).
  • मोबाईल क्षेत्रातील संस्था इंडिया सेल्युलर असोसिएशननेसुद्धा (आयसीए) रिंगिंग बेल्स कंपनीच्या दाव्याविषयी शंका उपस्थित करीत दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. (संदर्भः गॅजेट्स नाऊ)
  • दूरसंचार मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत तपासणीमध्येसुद्धा 2300 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये स्मार्टफोन विक्री केली जाऊ शकत नसल्याचा निर्वाळा दिला होता. (संदर्भः इंडिया टुडे)
  • फ्रीडम 251 या स्मार्टफोममधील अनेक त्रुटी दाखवून हा 2016 मधील सर्वात मोठा स्कॅम कसा ठरू शकतो याविषयी सविस्तर लेख येथे वाचा – इंडिया टाईम्स

निष्कर्ष

नरेंद्र मोदी यांनी फ्रीडम 251 हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला नव्हता. तसेच भारत सरकारचा या फोनची निर्मिती करणाऱ्या रिंगिंग बेल्ससह कोणताही करार नव्हता. हा फोन मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते लाँच केला होता. त्यामुळे फेसबुकवरील संबंधित पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: जगातील सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 मोदींनी लाँच केला होता का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False