
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक सुरक्षा कर्मचारी बांगलादेशचे झेंडे विकणाऱ्या व्यक्तीला मारहाण करतो.
दावा केला जात आहे की, “बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) जवानाने बांगलादेशचे झेंडे विकणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक सुरक्षा कर्मचारी बांगलादेशचे झेंडे विकणाऱ्या व्यक्तीला मारहाण करताना दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बांगलादेशचे झेंडे विकणाऱ्याला केन ट्रिटमेंट देणाऱ्या या BSF जवानाला त्रिवार सॅल्युट.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, ही घटना बांगलादेशमध्ये घडली होती.
ढाका पोस्ट आणि न्यूज1 टीव्ही नामक युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 12 जून रोजी शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “लाठीचार्ज झालेल्या ध्वज विक्रेत्याला लष्कराने 1 लाख रुपयांची भेट दिली.”
मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, 10 जून रोजी ढाका येथे झालेल्या बांगलादेश विरुद्ध सिंगापूर फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने प्रेक्षक जमले होते, ज्यांपैकी बहुतेकांकडे तिकिटे नव्हती. गेट क्रमांक 4 समोरील काही लोकांनी तिकीट न घेता आत जाण्याचा प्रयत्न केला आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी लष्कराने जमावावर लाठीचार्ज केले. या गोंधळादरम्यान, लष्कराच्या एका सदस्याने चुकून एका निष्पाप ध्वज विक्रेत्यावर लाठीचार्ज केला. लष्कराने ही घटना अनावधानाने घडलेल्याचे सांगितले.
गुलिस्तान आर्मी कॅम्प कमांडर लेफ्टनंट कर्नल अफजलुर रहमान चौधरी यांनी सांगितले की, “या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मी 11 जून रोजी ध्वज विक्रेत्याला भेटलो आणि औपचारिकपणे शोक व्यक्त केले. तसेच सहानुभूती म्हणून त्या व्यक्तीला एक लाख रुपये देण्यात आले.”
अधिक माहिती येथे व येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ भारताशीसंबंधित नसून ही घटना बांगलादेशमध्ये घडली होती. या घटनेनंतर लष्करी अधिकाऱ्यांनी ध्वज विक्रेत्याची माफी मागितली आणि त्याला 1 लाखाची रोख रक्कम दिली. दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:बांगलादेशचे झेंडे विकणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ भारतातील नाही; सत्य वाचा
Written By: Sagar RawateResult: False
