
हैदराबाद येथील युवतीवर अत्याचार करुन तिचा मृतदेह जाळून टाकल्यानंतर देशभरात महिला सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यातच दिल्लीतील निर्भया प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा म्हणून एक फोटो सध्या समाजमाध्यमात फिरत आहे. संदीप रावत राजपुत यांनीही असे एक छायाचित्र पोस्ट केले आहे. मित्रांनो विसारला का या राक्षसाला, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी याचीही चकमक घडवून आणा भेटा मोहम्मद अफरोजला. हा तोच नराधम आहे ज्याने निर्भयावर अत्याचार केल्यानंतर तिच्या गुप्तांगात रॉड टाकत तिला मारून टाकले होते, असे म्हटले आहे. याला केजरीवाल यांनी बक्षीस म्हणून दहा हजार रुपये आणि शिवणयंत्र दिले होते. याचे जीवंत राहणे निर्भया सोबत अन्याय आहे.
तथ्य पडताळणी
दिल्लीतील निर्भया प्रकरणातील छायाचित्रात दिसणारी व्यक्ती अल्पवयीन आरोपी आहे का, हे शोधण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी मिळालेल्या परिणामात आम्हाला इंडिया टूडेच्या संकेतस्थळावरील 5 मे 2017 रोजी एक वृत्त देण्यात आले असून या वृत्तात वापऱण्यात आलेल्या छायाचित्रात आरोपीचा चेहरा झाकलेला दिसून येत आहे. निर्भया प्रकरणात अल्पवयीन आरोपी सुटका झाल्यानंतर आता आचारी म्हणून दक्षिण भारतात काम करत असल्याची माहिती या वृत्तात देण्यात आलेली आहे. हा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचे नावही या वृत्तात कुठेही देण्यात आलेले नाही.
इंडिया टूडेचे मुळ वृत्त / Archive
अल्पवयीन आरोपीचा छायाचित्र माध्यमांनी प्रसिध्द केलेले नाहीतर हे छायाचित्र कुणाचे हा प्रश्न मात्र कायम होता. त्यामुळे आम्ही आमचा आणखी पुढे नेला त्यावेळी आम्हाला गिट्टी इमेजसच्या संकेतस्थळावर 13 सप्टेंबर 2013 रोजीचे एक छायाचित्र दिसून आले. हा निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्मा असल्याचे छायाचित्रासोबत देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे. त्याला दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी हे छायाचित्र घेण्यात आलेले आहे. हिंदूस्थान टाईम्सच्या संकेतस्थळानेही 11 डिसेंबर 2015 रोजी हे छायाचित्र वापरले असून तो निर्भया प्रकरणातील आरोपी विनय शर्मा असल्याचे म्हटले आहे.
विनय शर्माने 16 डिसेंबर 2016 रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या वृत्तातही हिंदूस्थान टाईम्सने हे छायाचित्र वापरले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2017 रोजी विनय शर्माला अन्य तीन आरोपींसह फाशीची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन आरोपीस अरविंद केजरीवाल यांनी वैयक्तिक कोणतीही मदत केल्याचे वृत्त आम्हाला दिसून आले नाही. दिल्ली सरकारने मात्र अल्पवयीन आरोपीच्या पुर्नवसनासाठी आपण दहा हजार रुपये देणार असल्याचे कोर्टात सांगितले होते. दिल्ली सरकारने ही मदत केली की नाही याची पुष्टी देणारे वृत्त मात्र कुठेही दिसून येत नाही. शिवणयंत्राची मदत एक बिगरसरकारी संस्था करणार होती. ही मदत करण्यात आली की नाही याची पुष्टी होत नाही. दैनिक भास्करच्या संकेतस्थळाने 15 डिसेंबर 2015 रोजी याबाबत दिलेले वृत्त आपण खाली पाहू शकता.
दैनिक भास्करच्या संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive
अल्पवयीन आरोपीच्या नावाच्या पुष्टी होणारे कोणतेही वृत्त अथवा अधिकृत माहितीही कुठेही उपलब्ध असल्याचेही दिसून येत नाही.
निष्कर्ष
समाजमाध्यमात निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे म्हणून पसरत असलेले छायाचित्र हे निर्भया प्रकरणातील दुसरा आरोपी विनय शर्मा याचे आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीला केजरीवाल यांनी वैयक्तिकरित्या कोणतीही मदत केलेली नाही. दिल्ली सरकारने त्याला कोणतेही बक्षीस दिले नाही तर पुर्नवसनासाठी मदतीची तयारी दर्शवली होती. ती करण्यात आली असेही ठामपणे म्हणता येत नाही. अल्पवयीन आरोपीच्या नावाचीही पुष्टी होत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact : निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा हा फोटो नाही
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
