चीनमध्ये 30 हजार कोरोना व्हायरसबाधित रुग्णांना मारण्याची बातमी खोटी आहे. वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या 30 हजार रुग्णांना मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी चीन सरकारने सर्वोच्च न्यायालयात केल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे. काही वेबसाईटने ही बातमी दिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सने ही बातमी पसरविली. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव सर्वदूर पसरत असताना ही बातमी नक्कीच भीती निर्माण करणारी आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केल्यानंतर ही बातमी खोटी असल्याचे कळाले.

काय आहे बातमी?

कोरोना व्हायरसने भयंकर रुप धारण केलं आहे. हा व्हायरस असाच वाढत राहिला तर अधिक लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना व्यायरसने बाधित झालेल्यांना मारण्याची परवानगी द्या, जेणे करुन या व्हायरसचा संसर्ग रोखता येईल, अशी मागणी चीन सरकारने न्यायालयात केल्याचं सांगण्यात येतंय,’ असे थोडक्यात नावाच्या न्यूज पोर्टलने बातमी दिली आहे.

मूळ बातमी येथे वाचा –  थोडक्यातअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील बातमीमध्ये कुठेदेखील ही माहितीचा स्रोत दिलेला नाही. ही माहिती कोणी दिली, त्याला आधार कोणता, कोणत्या अधिकृत यंत्रणेनी ही एवढी मोठी बातमी दिली याचा उल्लेख ‘थोडक्यात’ या पोर्टलच्या बातमीत नाही. त्यामुळे अशा बातमीवर विश्वास ठेवणे कठीण आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, चीनमध्ये कोरोना व्हायरसबाधित रुग्णांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, त्यांना मारण्याची परवानगी मागितल्याची कोणतीही माहिती यामध्ये नाही.

इंटरनेटवर अधिक सर्च केल्यावर कळाले की, AB-TC (City News) नावाच्या एका वेबसाईटने सर्वप्रथम ही बातमी दिली होती. त्यानुसार, कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी चीनी सरकारने सुमारे 20 हजार विषाणूबाधित रुग्णांना मारण्याची तेथील सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. 

मूळ बातमी येथे वाचा – सिटी न्यूजअर्काइव्ह

परंतु, या बातमीतदेखील माहितीचा सोर्स दिलेला नाही. “स्थानिक अधिकरी”, “सुत्र” अशा मोघम सोर्सद्वारे बातमी देण्यात आली आहे. या बातमीचा लेखक कोण आहे (Byline) दिलेले नाही. विशेष म्हणजे या स्वतःला न्यूज वेबसाईट म्हणून सांगणाऱ्या पोर्टलवरील कोणत्याही बातमीला लिहिणाऱ्याचे नाव देण्यात आलेले नाही.

वेबसाईटवर About Us हे सेक्शन नाही. म्हणजे ही वेबसाईट कोणाची आहे, त्यांचा उद्देश काय? याची काहीही माहिती दिलेले नाही. त्यामुळे या वेबसाईटची विश्वार्हता शंकास्पद आहे.

या वेबसाईटवरील लोगो गुगल आणि यांडेक्स रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोध घेतला असता कळाले की, Dailybn  आणि  Todaykos  या वेबसाईटवरदेखील हा लोगो वापरण्यात आला आहे. या सगळ्या वेबसाईटमध्ये Contact Us  ही माहिती चुकीची अथवा रिकामी सोडण्यात आली आहे.

या वेबसाईटविषयी अधिक शोध घेतल्यावर कळाले की, यावरील अनेक बातम्या खोट्या असल्याचे फॅक्ट चेकमध्ये सिद्ध झालेले आहे. 

सिंगापुरच्या सरकारनेसुद्धा ही वेबसाईट फेक न्यूज पसरवित असल्याचे म्हटले आहे. सिंगापुरमध्ये 6 नवे कोरोना व्हायरस सापडल्याचे सिटी न्यूज या वेबसाईटने खोटी बातमी दिली होती, असे सिंगापूर सरकारने अधिकृतपणे प्रसिद्धपत्रक काढून स्पष्ट केले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ बातमी येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

या वेबासाईटची तांत्रिक माहिती जाणून घेण्यासाठी Who.is या वेबसाईटला भेट दिली. यामध्ये कळाले की, या वेबसाईटची नोंद चीनमध्ये झाली आहे. परंतु, या व्यतिरिक्त कोणतीही माहिती नाही. 

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, चीन सरकारने कोरोनाबाधित रुग्णांना मारण्याची परवानगी मागितलेली नाही. एका अविश्वसनीय आणि यापूर्वीदेखील फेक न्यूज देणारी वेबसाईट म्हणून प्रस्थापित झालेल्या सिटी न्यूज पोर्टलने अशी खोटी बातमी पसरविली होती. त्यामुळे 30 हजार जणांना मारण्याची बातमी खोटी आहे.

Avatar

Title:चीनमध्ये 30 हजार कोरोना व्हायरसबाधित रुग्णांना मारण्याची बातमी खोटी आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False