छातीच्या ‘एक्स-रे’मध्ये झुरळ असल्याचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल. जाणून घ्या काय आहे सत्य

False आरोग्य

सोशल मीडियावर काही गोष्टी थोड्या-थोड्या काळानंतर पुन्हा डोकं वर काढू लागतात. काही वर्षांपूर्वी छातीच्या एक्स-रेमध्ये झुरळ दिसत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. हाच फोटो आता पुन्हा सोशल मीडियावर फिरत आहे. कोल्हापुरच्या एका व्यक्तीच्या छातीच्या एक्स-रेमध्ये असा झुरळ असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली.

काय आहे पोस्टमध्ये?

“कोल्हापूरचा एक पेशंट एक्सरे घेण्यासाठी दवाखान्यात गेला. एक्स-रे घेतल्यावर डॉक्टरानी त्याला सांगीतले, तुझ्या छातीत एक जिवंत झुरळ शिरला आहे सर्जरीसाठी मुंबईला जावे लागेल. मुंबईत गेल्यावरे डॉक्टरानी तपासणी केली व सांगितले ऑपरेशनची काही गरज नाही,  तुमच्या कोल्हापूरच्या एक्सरे मशिनमध्ये झुरळ शिरला होता,” असे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. सोबत झुरळ असलेल्या एक्स-रेचा फोटो दिलेला आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर विकिपीडिया वेबसाईटवरील चेस्ट रेडियओग्राफ पेज समोर आले. यामध्ये हा फोटो वापरण्यात आला आहे. मूळ एक्स-रेमध्ये झुरळ नसल्याचे दिसते. सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो एका 21 वर्षीय महिला फुटबॉल खेळाडूचा आहे. खेळताना दुसऱ्या खेळाडुशी टक्कर झाल्यावर तिच्या छातीत कळ येत होती. त्यामुळे तिने हा एक्स-रे काढला होता. यामध्ये झुरळ दिसत नाही. दोन्ही एक्स-रे फोटोंची तुलना केल्यावर हे स्पष्ट होते.

मूळ फोटो येथे पाहा – विकिपीडिया

काही वर्षांपूर्वी हा मेसेज झिंबाम्ब्वे येथील रुग्णाच्या नावे फिरायला सुरुवात झाली होती. त्यावेळी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मार्लिन मुनरो हिचा एक्स-रे वापरून त्यात फोटोशॉपद्वारे झुरळ दाखवण्यात आला होता. आफ्रिकेत हा मेसेज प्रचंड व्हायरल झाल्यानंतर कंम्बोडिया देशातील आरोग्य मंत्रालयाने 2018 साली याविषयी पत्रक काढून खुलासा केला होता. एक्स-रेमध्ये झुरळ असल्याचा मेसेज धदांत खोटा असून लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.

मूळ बातमी येथे वाचा – खेमर टाईम्सद सन डेली

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, कोल्हापूर येथील रुग्णाच्या एक्स-रेमध्ये झुरळ असल्याचा मेसेज खोटा आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या एक्स-रेमध्ये फोटोशॉपद्वारे झुरळ दाखवून लोकांना चुकीची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नये. 

Avatar

Title:छातीच्या ‘एक्स-रे’मध्ये झुरळ असल्याचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल. जाणून घ्या काय आहे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False