FACT CHECK: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस केवळ 230 जागांवर लढत आहे का?

False राजकीय | Political

लोकसभा निवडणुकीसाठी उद्या (19 मे) शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. त्यानंतर 23 मे रोजी निकाल घोषित केले जातील. अशा राजकीय गरमागरमीच्या काळात जो तो कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त करीत आहे. सोशल मीडियावर काँग्रेसचे नेते अशोक तंवर यांच्या काँग्रेस 400 जागांवर विजय साकरणार या कथित वक्तव्याची खिल्ली उडविली जात आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला की, जर काँग्रेस केवळ 230 जागांवर निवडणूक लढत असेल तर 400 जागा कुठून येणार. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये काय आहे?

हिमाचल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक तंवर यांच्या फोटोसह लिहिले की, कॉँग्रेस एकट्याच्या दमावर 400 जागा जिंकणार. या विधानाची टर उडविताना खाली म्हटले की, यांना कोणी तरी सांगा काँग्रेस केवळ 230 जांगावरच उभी आहे आणि हा ज्यूनियर पप्पू 400 जागांचा दावा करीत आहे. सोबत “आएगा तो मोदी ही” अशी ओळ आहे.

तथ्य पडताळणी

अशोक तंवर यांनी खरोखरंच असे विधान केले का याचा शोध घेतला. तंवर यांनी असे विधान केल्याच्या बातम्या आढळल्या नाही. ANI वृत्तसंस्थेच्या 19 मार्च रोजीच्या बातमीमध्ये अशोक तंवर यांनी हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष सर्व 10 जागा जिंकणार असा दावा केला होता. यामध्ये त्यांनी 400 जागांचा उल्लेख केला नव्हता.

मूळ बातमी येथे वाचा – ANIअर्काइव्ह

यानंतर काँग्रेस नेमक्या किती जागांवर लढत आहे याची माहिती घेतली. टाईम्स ऑफ इंडियाने 25 एप्रिल रोजी दिलेल्या बातमीमध्ये काँग्रेसने 423 जागांवर उमेदवार घोषित केल्याचे म्हटले आहे. यंदा प्रथमच काँग्रेसला मागे टाकत 437 जागांसह भाजप देशात सर्वाधिक जागा लढत आहे. काँग्रेसच्या एकुण उमेदवार संख्येत दोन-चार नावे वाढण्याची शक्यता बातमीत व्यक्त करण्यात आली.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

एनडीटीव्हीनेसुद्धा 25 एप्रिल रोजी यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षातर्फे 423 उमेदवार रिंगणात असल्याचे म्हटले आहे. नंतरच्या काही दिवसांमध्ये काँग्रेस काही आणखी उमेदवार घोषित करेल, असे बातमीत म्हटले आहे. तसेच 2009 पासून लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती उमेदवार उभे केले याची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार काँग्रेसने 2014 साली 464 जागा लढविल्या होत्या. त्यापूर्वी 2009 मध्ये 440 जागांवर उमेदवार होते.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्हीअर्काइव्ह

मग काँग्रेसने अखेर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत किती उमेदवार उभे केले?

काँग्रेसच्या अधिकृत वेबसाईटवर पक्षातर्फे तिकिट देण्यात आलेल्या संपूर्ण उमेदवारांची नावे दिली आहेत. राज्य आणि मतदारसंघनिहाय ही यादी आहे. यादीनुसार काँग्रेसने यंदा 424 जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

मूळ यादी येथे पाहा – काँग्रेस लोकसभा उमेदवार यादीअर्काइव्ह

निष्कर्ष

सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या दाव्याप्रमाणे काँग्रेस यंदाच्या लोकसभेला 230 जागांवर लढत नाही. काँग्रेसने 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये 424 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे हा दावा खोटा ठरतो.

Avatar

Title:FACT CHECK: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस केवळ 230 जागांवर लढत आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False