
जगातील सर्वात लोकप्रिय मांजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रंपी कॅटचे 17 मे रोजी निधन झाले आणि इंटरनेटवर शोककळा पसरली. चेहऱ्यावर कायमच एक वैतागलेला भाव असलेली ही मांजर 2012 साली प्रथम प्रकाश झोतात आली होती. तेव्हापासून लाखो चाहते तिला फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. तिच्या निधनाची बातमी सगळ्या प्रतिष्ठत दैनिक आणि वृत्तवाहिन्यांनी दिली. सोशल मीडियावर तिच्या आठवणी, तिच्यासाठी शोकसंदेश लिहण्यात येऊ लागले. अनेक सेलिब्रेटिंनी ग्रंपी कॅटच्या निधनावर दुःख व्यक्त केले. अशी ही जगप्रसिद्ध मांजर अब्जाधीश असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. टीव्ही-9 वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, ग्रंपी कॅट 7 अब्ज 3 कोटी 48 लाखांच्या संपत्तीची मालक होती.
काय आहे बातमीत
बातमीत म्हटले की, ग्रंपी कॅट या मांजरीकडे 100 मिलियन डॉलर्स एवढी संपत्ती होती. भारतीय रुपयांमध्ये ती 7 अब्ज 3 कोटी 48 लाख एवढी होते. वयाच्या सातव्या वर्षी ग्रंपी कॅटचे निधन झाले. हा आकडा कुठून आला याचा बातमीत संदर्भ किंवा स्रोत दिलेला नाही. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ बातमी येथे वाचा – टीव्ही-9 । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
ग्रंपी कॅटचे खरे नाव टार्डर सॉस होते. अमेरिकेतील अरिझोना येथील टबाथा बंडसेन तिची मालकीण. टबाथाच्या भावाने या मांजरीचा एक फोटो 2012 साली रेडिट वेबसाईटवर अपलोड केला होता. पाहतापाहता हा फोटो इंटरनेट सेन्सेशन बनला. चेहऱ्यावरील वैतागलेल्या भावामुळे नेटीझन्सद्वारे तिचे ग्रंपी कॅट असे नामकरण केले. तिच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आर्थिक कमाईदेखील सुरू झाली. तिचा फोटो असणारे मर्चंडाईज विकले जाऊ लागले, तिच्यावर एक पुस्तक आणि गंपी कॅट्स वर्स्ट ख्रिसमस एव्हर हा चित्रपटही निघाला. एवढेच नाही तर मादाम तुसाँमध्ये तिचा मेणाचा पुतळादेखील आहे. गेल्या वर्षी कॉपीराईटचे उल्लंघन केल्यामुळे एका कंपनीला ग्रंपी कॅटला 7 लाख डॉलर्सची भरपाई द्यावी लागली. त्यामुळे ग्रंपी कॅट एक श्रीमंत मांजर होती. पण ती खरंच सात अब्जांची (700 कोटी) मालकीण होती का?
ग्रंपी कॅटची संपत्ती किती होती याचा शोध घेतला असता विविध पोर्टल्सवरील बातम्यांमध्ये ब्रिटिश वेबसाईट डेली एक्सप्रेसचा हवाला देत ग्रंपी कॅटकडे 100 मिलियन डॉलर्सची संपदा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे डेली एक्सप्रेसची ती मूळ बातमी शोधून काढली. डेली एक्सप्रेसने 7 डिसेंबर 2014 रोजी दिलेल्या बातमीमध्ये सर्वप्रथम ग्रंपी कॅटची 64 मिलियन पाऊंड संपत्ती असल्याचे म्हटले होते. अमेरिकन डॉलर्समध्ये हा आकडा 100 मिलियन होतो. विशेष म्हणजे डेलि एक्सप्रेसच्या बातमीत केवळ शीर्षक आणि उपशीर्षकात 64 मिलियन पाऊंडचा उल्लेख आहे, मूळ बातमीत नाही.

मूळ बातमी येथे वाचा – डेली एक्सप्रेस । अर्काइव्ह
या बातमीचा आधार घेत गंपी कॅटची संम्पती 100 मिलियन डॉलर असल्याचे म्हटले जाऊ लागले. परंतु, जेव्हा ग्रंपी कॅटची मालकीण टबाथा बंडेसेनला याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने 8 डिसेंबर 2014 रोजी हफिग्टंन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताचे खंडन केले. 100 मिलियन डॉलर्स संपत्तीचा आकडा खोटा असल्याचे तिने सांगितले. विविध डील्सच्या माध्यमातून आर्थिक कमाई जरी होत असली तरी ती एवढी जास्त नाही. मात्र, खरी किती संपती आहे याचा तिने खुलासा केला नाही.

मूळ बातमी येथे वाचा – हफिग्टंन पोस्ट । अर्काइव्ह
टाईम मॅगझीननेदेखील ग्रंपी कॅटची संम्पती किती आहे हे निश्चित सांगता येत नाही, असेच म्हटले आहे. डेलि एक्सप्रेसच्या बातमीचे टबाथाने खंडन केल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

मूळ लेख येथे वाचा – टाईम । अर्काइव्ह
हीच गोष्ट फॉक्स बिझनेस, यूएसए टुडे आणि न्यूजवीकने देखील नमुद केली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – फॉक्स बिझनेस । अर्काइव्ह
न्यूयॉर्क मॅगझीनने 2013 साली ग्रंपी कॅटीची संपत्ती 1 मिलियन डॉलर्स असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ग्रंपी कॅटीच संपत्ती 1 ते 100 मिलियनच्यामध्ये असल्याचा कयास बांधला जातो. परंतु, कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.

मूळ बातमी येथे वाचा – न्यूयॉर्क मॅगझीन । अर्काइव्ह
निष्कर्ष
ग्रंपी कॅट ही नक्कीच जगातील श्रीमंत मांजरांपैकी एक होती. परंतु, तिची संपत्ती नेमकी किती आहे याबाबत कोणतेही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. डेलि एक्सप्रेसने दिलेला 100 मिलियन डॉलर्सचा आकडा तर मालकीण टबाथाने स्वतःचा खोटा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सदरील बातमीतून वाचकास संमिश्र माहिती मिळते.

Title:GRUMPY FACT: खरंच ग्रंपी कॅट 7 अब्ज रुपयांच्या संपत्तीची मालकीण होती का?
Fact Check By: Mayur DeokarResult: Mixture
