POWER FACT: जगातील सर्वात शक्तीशाली देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे का?

False राजकीय | Political

जगातील सर्वात शक्तीशाली देशांची वार्षिक प्रसिद्ध झाली आहे. भारतीयांसाठी खुशखबर म्हणजे आपला देश आता जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात शक्तीशाली देश बनला आहे. केवळ चीन, रशिया आणि अमेरिका हेच भारतापुढे आहेत, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. भारताचे वाढते प्रस्थ आणि सुपरपॉवर होण्याच्यादृष्टीने ही रँकिंग अतिशय महत्वाची असल्याचे नेटीझन्स म्हणत आहेत. अशी काही यादी प्रसिद्ध झाली आहे का आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो याचा फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

एका युजरने 21 जून रोजी शेयर केलेल्या पोस्टमध्ये नरेंद्र मोदींचा फोटो देऊन म्हटले की, जगातील सर्वात शक्तीशाली देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा चौथा क्रमांक मिळाला. फक्त अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन देशच भारताच्या पुढे आहेत. मोदी युग!

तथ्य पडताळणी

गुगलवर घेतल्यावर बिझनेस इनसाईडर वेबसाईटवरील एक बातमी आढळली. यामध्ये गेल्या वर्षीची सर्वात शक्तीशाली देशांची यादी (The 25 Most Powerful Nations On Earth) दिलेली आहे. त्यानुसार, 2018 मध्ये भारताचा 15 क्रमांक होता. ही यादी यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्ट कंपनीद्वार दरवर्षी प्रकाशित केले जाते. हा धागा पकडून यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली.

सुमारे 85 वर्षांचा इतिहास असलेली ही कंपनी विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संस्था, देश, राज्य, शहरे यांची यादी प्रकाशित करते. यासाठी बीव्हीए ग्रुप आणि व्हार्टन स्कूल ऑफ युनिव्हर्सिटी तर्फे जगभरातील 80 देशांतील सुमारे 20 हजार लोकांचे सर्वेक्षण तसे, देशाची अर्थव्यवस्था, राजकीय प्रभाव, विकास दर, सैन्य बळ, जीवनमान अशा विविध निकषांवर शक्तीशाली देशांची यादी तयार केली जाते.

मूळ यादी येथे पाहा – पॉवर रँकिंग 2019

यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्टच्या ताज्या यादीनुसार, जगातील सर्वात शक्तीशाली देशांच्या यादीत (पॉवर रँकिंग) भारताचा 17 क्रमांक लागतो. गेल्या वर्षी भारताचा 15 वा रँक होता. भारताचा जीडीपी 2.6 ट्रिलियन डॉलर्स असून, लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे. यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर रशिया, चीन, जर्मनी, ब्रिटन, यांचा अनुक्रमे पहिल्या पाच देशांमध्ये क्रमांक आहे. जगातील सर्वात शक्तीशाली 25 देशांची यादी खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

याच कंपनीद्वारे जगातील सर्वोत्कृष्ट देशांची यादीसुद्धा (Overall Best Countries Ranking ) प्रकाशित केली जाते. त्यामध्ये भारताचा 27 वा क्रमांक आहे. गेल्यावर्षी तो 25 होता. म्हणजे येथे सुद्धा देशाची रँकिंग घसरली. स्वित्झर्लंड, जपान, कॅनडा, जर्मनी आणि इंग्लंड हे जगातील सर्वोत्कृष्ट देश आहेत. ही यादी कशी तयार केली जाते, त्याचे निकष काय यासंबंधी सविस्तर येथे वाचू शकता.

मग भारताचा चौथा क्रमांक कोणत्या यादीमध्ये आहे?

सैन्यबळावर आधारीत ग्लोबर फायरपॉवर लिस्टमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. शस्त्रास्त्र, सैनिकांची संख्या, सुरक्षा बजेट यासारख्या निकषांवरून ही यादी तयार करण्यात येते.

निष्कर्ष

जगातील सर्वात शक्तीशाली देशांच्या यादीत भारताचा 17 वा क्रमांक आहे. त्यामुळे भारताला या यादीत चौथा रँक मिळाल्याची पोस्ट असत्य आहे. भारताचा ग्लोबल फायरपॉवर यादीत चौथा क्रमांक लागतो.

Avatar

Title:POWER FACT: जगातील सर्वात शक्तीशाली देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False