FACT CHECK: मुख्यमंत्र्यांनी मराठीऐवजी केवळ हिंदीतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या का?

False राजकीय | Political

विधानसभा निवडणूक आता तोंडावर आलेली असताना मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गणेश चतुर्थीनिमित्त मराठीऐवजी हिंदी भाषेतून शुभेच्छा दिल्याबद्दल टीका करण्यात येत आहे. एकीकडे ट्विटर इंडिया आणि अमेरिकेच्या दूतावासाने मराठीतून गणेशोत्सवाचे शुभेच्छा संदेश दिल्याचे उदाहरण देत, मुख्यमंत्र्यांनी मात्र केवळ हिंदीतून फेसबुकवर शुभेच्छा दिल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकफेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

सदरील फेसबुक पेजने 2 सप्टेंबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ट्विटर इंडिया असो किंवा अमेरिकेचा दूतावास, यांना आपल्या मराठमोळ्या भाषेत शुभेच्छा द्यायला जमतं. पण खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मात्र राज्यभाषेचे वावडे आहे. सोबत ट्विटर इंडिया, अमेरिकेचा दूतावास यांच्या मराठीतील पोस्ट आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदीतील पोस्टचा स्क्रीनशॉट दिलेला आहे.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील स्क्रीनशॉटवरून देवेंद्र फडणवीस नावाच्या फेसबुक पेजवरील पोस्टचा हा स्क्रीनशॉट आहे. सदरील पेजला भेट दिल्यावर कळाले की, देवेंद्र फडणवीस यांचे हे अधिकृत फेसबुक पेज आहे.

मुख्यमंत्र्यांनी येथे हिंदी बरोबरच मराठीतूनही शुभेच्छा दिलेल्या आहेत. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा देताना व्हिडियोदेखील आहेत. फडणवीस यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

त्यांनी मराठीतून “गणेशोत्सवानिमित्त सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!” आणि हिंदीतून “गणेश पर्व की तमाम देशवासियों को हार्दिक शुभकामनाएँ” अशा शुभेच्छा दिल्या.

अमेरिकन दूतावासानेसुद्धा 2 सप्टेंबर रोजी मराठीतून शुभेच्छा दिल्या की, गणपती बाप्पा मोरया ! आम्हाला सर्वांना सुबुद्धी द्या! यु एस कॉन्सुलेटतर्फे सर्वांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

ट्विटर इंडियाच्या अधिकृत अकाउंटवरूनसुद्धा गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पा मोरयागणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा अशा मराठीतून शुभेच्छा देण्यात आल्या.

निष्कर्ष

ट्विटर इंडिया आणि अमेरिकन दूतावासाप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मराठीतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी मराठीऐवजी हिंदीतून शुभेच्छा दिल्याचा दावा चुकीचा ठरतो.

Avatar

Title:FACT CHECK: मुख्यमंत्र्यांनी मराठीऐवजी केवळ हिंदीतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False