कोल्हापुरतील विजयी काँग्रेस उमेदवारीची ही मिरवणूक नाही; ही तर इंदूरमधील होळी

False राजकीय | Political

नुकतेच कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला हरवून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८ हजारावर मताधिक्क्याने विजय मिळवला. यानंतर हजारोंच्या संख्येने गुलाल उधळत जल्लोष करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, पोटनिवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसच्या उमेदरावारीच अशी भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ कोल्हापूरमधील विजयी मिरवणूक नाही. 

काय आहे दावा?

लोकांवर गुलालाची बेभान उधळण होतानाचा व्हिडिओ शेयर करून म्हटले आहे की, “कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या विजयी उमेदवाराची भव्य मिरवणूक. जय महाविकास आघाडी.”

फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हाच व्हिडिओ कानपूर आणि इंदूर शहरातील होळीचा म्हणून शेयर केल्याचे आढळले. जशी व्हायरल वीडियोमधील गुलाल उधळणारी मशीन आहेत तशीच मशीन आयबीसी-24 नावाच्या युट्यूब चॅनेलवरील बातमीतही दिसते. या बातमीनुसार, हे दृश्य इंदूरमधील होळीच्या ‘गेर’ आयोजनतील आहे.

हा धागा पकडून आम्ही इंदूरमध्ये ही जागा कुठे असू शकते याचा शोध घेतला. इंदूर जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर आम्हाला व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या जागेचा फोटो मिळाला. डिजी मेकर्स नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरून सर्वप्रथम हा फोटो 25 मार्च 2019 रोजी शेअर करण्यात आला होता. 

फॅक्ट क्रेसेंडोने ‘डिजी मेकर्स’चे सहसंस्थापक शुभम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, वरील फोटो इंदूरमधील राजवाडा चौकातील आहे. तसेच व्हायरल व्हिडिओसुद्धा इंदूरचाच आहे.

वरील फोटो आणि व्हायरल व्हिडिओ यामध्ये दिसणारी इमारत एकच आहे. खाली दिलेल्या तुलनेत हे स्पष्ट दिसते.

एवढेच नाही तर, डिजी मेकर्सद्वारे शेयर करण्यात आलेल्या फोटोमध्ये उजवीकडील वरच्या कोपऱ्यात जी पांढरी इमारत दिसते ती गणेस कॅप मार्टची बिल्डिंग आहे. 

गुगल मॅपवर शोध घेतला असता इंदरूमधील गणेश कॅप मार्टचे लोकेशन टॅग केलेल फोटोसुद्धा सापडले. खाली दिलेल्या तुलनेतून स्पष्ट होते की हा फोटो इंदूरमधीलच आहे. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ कोल्हापुरमधील नाही. हा व्हिडिओ इंदूरमधील होळीचा आहे. त्यामुळे व्हायरल पोस्टमधील दावा असत्य आहे. ही काँग्रेसच्या विजयी उमेदवाराची मिरवणूक नाही. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:कोल्हापुरतील विजयी काँग्रेस उमेदवारीची ही मिरवणूक नाही; ही तर इंदूरमधील होळी

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False