कॅडबरी चॉकलेट HIV-बाधित असल्याची अफवा पुन्हा व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी हे वाचा

False सामाजिक

कॅडबरी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने एचआयव्ही बाधित रक्त चॉकेलटमध्ये मिश्रित केल्यामुळे कोणीही या कंपनीचे चॉकलेट खाऊ नये, असा मेसेज सोशल मीडियावर आणि खासकरून व्हॉट्सअ‍ॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे. सोबत पोलीस एका व्यक्तीला घेऊन जातानाचा फोटो दिला असून, हाच तो कर्मचारी असल्याचे म्हटले आहे. जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज पाठवण्याचे आवाहन या करण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून त्याची सत्यता पडताळण्याची विनंती केली. 

काय आहे मेसेजमध्ये?

पोलिसांनी पकडलेल्या एका व्यक्तीचा फोटो देऊन म्हटले की, “हा तोच व्यक्ती आहे ज्याने कॅडबरी चॉकलेटमध्ये HIV-बाधित रक्त मिश्रित केले आहे. बीबीसीने कालच याबाबत बातमी दिली आहे. त्यामुळे कोणीही कॅडबरीचे चॉकलेट खाऊ नये. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहचवा.” (भाषांतर)

तथ्य पडताळणी

कॅडबरीच्या कर्मचाऱ्याने चॉकलेटमध्ये खरंच एचआयव्ही बाधित रक्त मिश्रित केले आहे का याचा शोध घेण्यासाठी सदरील कर्मचाऱ्याचा फोटो रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्यक्ती कॅडबरीचा कर्मचारी नाही. तो तर नायजेरियामधील बॉम्बहल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. 

याहू न्यूजनुसार, नायजेरियाची राजधानी अबुजा येथील बसस्थानकावर एप्रिल 2014 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 75 लोकांचे प्राण गेले होते. बोको-हरम दहशतवादी संघटनेने हल्ला केल्याचे म्हटले होते. याप्रकरणी इंटरपोलने अमिनू उगवुचे नावाच्या या व्यक्तीला एप्रिल महिन्यात सुदानमध्ये अटक केली होती. जुलै महिन्यात नायजेरियात त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले. तेव्हा हे छायाचित्र काढण्यात आले होते.

मूळ बातमी येथे वाचा –  याहू न्यूजबीबीसी

याचाच अर्थ की, हा फोटो 2014 मधील असून, हा व्यक्ती कॅडबरी कंपनीचा कर्मचारी नाही. तो बॉम्ब हल्ल्यातील मुख्य आरोपी आहे. याविषयी अधिक सर्च केल्यावर कळाले की, एचआयव्ही बाधित कॅडबरी चॉकलेटविषयी गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर दावा केला जात आहे. कॅडबरी कंपनीने स्वतः ट्विटरवर याविषयी स्पष्टीकरण दिलेले आहे. कंपनीने 8 मार्च 2018 रोजी लिहिले की, कॅडबीर कंपनीच्या कर्मचाऱ्याने एचआयव्ही बाधित रक्त चॉकलेटमध्ये मिश्रित केल्याचा मेसेज निव्वळ एक अफवा आहे. लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.

एचआयव्ही विषाणू बाहेर किती वेळ जगू शकतो?

अमेरिकन सरकारच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (CDC) अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, एचआयव्हीचा विषाणू शरीराबाहेर फार काळ जिवंत नाही राहू शकत. तसेच मानवी शरीराबाहेर या विषाणूचे प्रजोत्पादनही होत नाही. बीबीसी मराठीवरील माहितीनुसार, एड्स रोग स्पर्श, अश्रू, घाम, लाळ किंवा मूत्रावाटे पसरत नाही. त्याचप्रमाणे हात मिळवणे, मिठी किंवा चुंबन घेणे, एकाच भांड्यात खाणे-पिणे, पाण्याचा समान स्रोत वापरणे (उदा. अंघोळीचे पाणी, शॉवर), खासगी वस्तू शेअर करणे आदींमुळेसुद्धा याचा संसर्ग होत नाही. एचआयव्ही बाधित व्यक्तीचं रक्त, वीर्य, योनीतील स्राव किंवा अंगावरचं दूध निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेलं तरच हा रोग पसरण्याची शक्यता असते.

अधिक माहितीसाठी येथे वाचा – CDCWHO

फॅक्ट क्रेसेंडोने हा मेसेज गेल्या वर्षीदेखील खोटा असल्याचे सिद्ध केले होते. त्याविषयी येथे वाचा.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, कॅडबरीच्या कर्मचाऱ्याने एचआयव्ही बाधित रक्त चॉकलेटमध्ये मिश्रित केलेले नाही. ती केवळ एक अफवा आहे. तसेच सदरील फोटोतील व्यक्ती कॅडबरी कंपनीचा कर्मचारी नाही. तो नायजेरियामधील बॉम्बस्फोट हल्ल्यातील मास्टरमाईंड आहे. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवू नये.

Avatar

Title:कॅडबरी चॉकलेट HIV-बाधित असल्याची अफवा पुन्हा व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी हे वाचा

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False