टुथपेस्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांविषयी ना ना प्रकारचे समज आहेत. त्यावरून संभावित धोक्यापासून लोकांना सावधान करणारे मेसेजेस सोशल मीडियावर फिरत असतात. असाच एक मेसेज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. टुथपेस्ट ट्यूबच्या मागील बाजूस असणाऱ्या काळी, निळी, लाल आणि हिरव्या रंगाच्या मार्कवरून (पट्टी) त्या टुथपेस्टमधील घटकांची माहिती मिळते, असे या मेसेजमध्ये सांगितले जाते. या प्रत्येक रंगाचा अर्थ सांगून टूथपेस्ट खरेदी करताना या मार्कवर लक्ष देणे गरजेचे असल्याचा सल्ला मेसेजमध्ये देण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुकवर शेयर करण्यात येणाऱ्या पोस्टमध्ये टुथपेस्टवर असणाऱ्या 'या' मार्कचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? असा प्रश्न विचारून टुथपेस्ट ट्यूबवरील प्रत्येक रंगाचा अर्थ खालीलप्रमाणे सांगितला आहे.

काळा रंग

तुम्ही टूथपेस्टच्या खालच्या बाजूस काळ्या रंगाचा मार्क पाहिला असेल तर ती टूथपेस्ट चुकूनही खरेदी करू नका. कारण काळ्या रंगाचा मार्क असणाऱ्या टूथपेस्टमध्ये केमिकल्सची मात्रा सर्वाधिक असते.

लाल रंग

टूथपेस्टवर जर लाल रंगाचा मार्क असेल तर ती टूथपेस्ट शरीरासाठीही फारशी घातक नसते. ती तयार करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांसोबतच केमिकल्सचाही वापर केलेला असतो.

निळा रंग

टूथपेस्टवर निळ्या रंगाचा मार्क असेल तर ती टूथपेस्ट तुमच्या आरोग्यासाठी फार चांगली असतो. निळ्या मार्कची टूथपेस्ट म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक घटकांव्यतिरिक्त त्यामध्ये काही केमिकल तत्वही असतात.

हिरवा रंग

हिरव्या रंगाचा मार्क असेलली टूथपेस्ट शरीरासाठी सर्वात फायदेशीर समजली जाते. हिरव्या रंगाच्या मार्कचा अर्थ टूथपेस्ट तयार करताना फक्त नैसर्गिक घटकांचाच वापर केलेला आहे असा होतो.

मेसेजचा उगम

सदरील मेसेजमध्ये दिलेली माहिती मूळात लोकमतची बातमी आहे. लोकमतच्या वेबासाईटवर 7 ऑगस्ट 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या या बातमीतील मजकूर जशास तसा या व्हायरल मेसेजमध्ये वापरण्यात (कॉपी-पेस्ट) आला आहे. या बातमीत टुथपेस्ट ट्यूबवरील विविध रंगाच्या मार्कचा अर्थ वरीलप्रमाणेच दिला आहे. 

लोकमतच्या अधिकृत फेसबुक पेजवरूनदेखील ही बातमी शेयर करण्यात आली होती. त्या पोस्ट तुम्ही येथे आणि येथे क्लिक करून पाहू शकता. एवढंच नाही तर देशातील अनेक प्रमुख मीडियाने (टाईम्स ऑफ इंडिया, अमर उजाला, न्यूज-18) टुथपेस्टवरील कलर मार्कविषयी हीच माहिती दिली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमतअर्काइव्ह

परंतु प्रश्न हा उद्भभवतो की, जर काळ्या रंगाचा मार्क असलेली टुथपेस्ट आरोग्यासाठी धोकादायक असेल तर कंपनी तसा मार्क उत्पादनावर का छापेल? अन्न व औषध प्रशासन ती टुथपेस्ट विकण्यास का परवानगी देईल?

तथ्य पडताळणी

ट्युबवरील रंगीत मार्कचा खरं काय अर्थ असतो याचा शोध सुरू केल्यावर द सन नावाच्या वृत्तस्थळावरील एक बातमी आढळली. 14 जुलै 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या या बातमीत या रंगीत मार्कविषयीच्या अफवेचे खंडन केले आहे. बातमीनुसार, रंगीत मार्क हे ट्युब उत्पादनाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. त्याचा आणि टुथपेस्टमधील रसायनांची मात्रा यांचा काहीही संबंध नसतो. रंगीत मार्कला “आय मार्क्स” म्णतात. ट्युबला कुठे कापायचे आणि फोल्ड करायचे याची मशीनला सूचना करण्याचे काम हे मार्क्स करीत असतात. हेल्थलाईन वेबसाईटवरीलसुद्धा हीच माहिती दिली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – द सनअर्काइव्ह

कोलगेट कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा कलर मार्क/कोड विषयक मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. कोलगेटने दिलेल्या माहितीनुसार, ट्युबवरील रंगीत मार्क हे लाईट सेन्सरला ट्युबचा शेवट कुठे आहे याची माहिती देतो, जेणेकरून ट्युब तयार करणाऱ्या मशीनला नेमके कुठे कापायचे आणि कुठे सील करायचे हे कळते.

मूळ लेख येथे वाचा – कोलगेटअर्काइव्ह

चीनमधील ऑबर पॅकेजिंग ही कंपनी विविध प्रकारच्या ट्युबचे उत्पादन करते. या कंपनीचे तत्कालिन सिनीयर ओव्हरसीज सेल्स मॅनेजर हेन्री पेंग यांनी लिंक्डइन वेबसाईटवर एक ब्लॉग लिहून रंगीत आय मार्कचा उपयोग सांगितला आहे. उत्पादनावर आय मार्क असण्याचे दोन कारण असतात. एक म्हणजे मागची आणि पुढची बाजूचे संरेखन (आलाईनमेंट) सारखे ठेवून पॅकेजवरील प्रिंटिंग सरळ ठेवणे आणि दुसरे म्हणजे पॅकेज कुठे कापायचे आणि फोल्ड करायचे याची माहिती देणे. आय मार्कच्या रंगाचा काहीच अर्थ नसतो. ट्युबच्या रंगानुसार आय मार्कचा रंग निवडण्यात येतो. त्यामुळे तो कोणताही असू शकतो. आय मार्क आणि उत्पादन याचा काहीच संबंध नसतो.

मूळ ब्लॉग येथे वाचा – लिंक्डइन

बेस्ट पॅकेजिंग कोको या युट्युब चॅनेलवर आय मार्कद्वारे पॅकेजची कशी कटिंग आणि फोल्डिंग केली जाते याचे प्रात्याक्षिक दाखविले आहे. ते तुम्ही खाली पाहू शकता. यावरून स्पष्ट होते की, केवळ टुथपेस्टच नाहीत इतर अनेक उत्पादनांच्या ट्युबवर हे रंगीत मार्क असतात. ते मशीनसाठी केवळ कट आणि फोल्ड मार्क म्हणून काम करतात.

https://www.youtube.com/watch?v=7mbBhGvA2Q8

आय मार्कविषयी अधिक येथे वाचा – Consolidated Label Company

निष्कर्ष

टुथपेस्ट ट्युबच्या खालच्या बाजूस असणारे रंगीत मार्क टुथपेस्टमधील रासायनिक तत्वांच्या प्रमाणांचे निर्देशक नसतात. लाल, निळा, हिरवा, काळा रंगाच्या मार्कचा टुथपेस्टच्या गुणवत्तेशी काही संबंध नसतो. ट्युबची निर्मिती करताना मशीनला ट्युब कुठे कापायची आणि फोल्ड करायची यासाठी ते मार्क असतात. त्यामुळे टुथपेस्टवरील रंगीत मार्कविषयीचा मेसेज खोटा आहे.

Avatar

Title:टुथपेस्ट खरेदी करताना रंगीत मार्क तपासण्याचा मेसेज खोटा आहे. विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य वाचा

Fact Check By: Agastya Deokar

Result: False