जपानमध्ये 1 जानेवारी रोजी शक्तिशाली भूकंप आला होता. या पार्श्वभूमीवर त्सुनामीचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शहरात पाणी शिरल्याने कार आणि बोटीसह सर्व काही वाहून जाताना दिसते. दावा केला जात आहे की, ती जपानमध्ये नुकतेच आलेल्या भूकंपानंतर आलेली त्सुनामी आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, त्सुनामीचा हा व्हिडिओ 13 वर्षांपूर्वीचा आहे. 2011 मध्ये जपानच्या मियाको शहरात ही त्सुनामी आली होती.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये शहरात पाणी शिरताना दिसते आणि त्यासोबत वाहने आणि बोटी वाहून जातात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये हॅशटग लिहितात की, #जपान #भूकंप #सुनामी

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, असोसिएटेड प्रेसच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने हाच व्हिडिओ 2011 मध्ये शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “त्सुनामी लाटेने बोटी आणि गाड्याचे नुकसान झाले.”

https://youtu.be/B01vktb2bj4?si=TNi-lRXx-x5uydp2

नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशन एजन्सीच्या अहवालानुसार 2011 साली जपानमधील होन्शू भागाच्या ईशान्य किनाऱ्यावर 9.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपामुळे निर्माण झालेली त्सुनामी 30 मिनिटांत किनारपट्टीवर आली. या त्सुनामीत 18 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपला ‘ग्रेट ईस्ट जपान भूकंप आणि त्सुनामी’ म्हणून ओळखले जाते. हा 1900 सालनंतरचा जगातील तिसरा मोठा भूकंप होता.

खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, 2011 साली जपानमध्ये आलेली त्सुनामी किती शक्तीशाली होती.

https://youtu.be/zxm050h0k2I?si=i1gQ2DCh-6B-XDQs

जपानमधील सध्याची परिस्थिती

लोकसत्ताच्या बातमीनुसार 1 जानेवारी रोजी जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, जो मागे घेण्यात आला. परंतु, या इशाऱ्यानंतर किनारपट्टी भागांतील सुमारे एक लाख नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.

तसेच 2011 नंतर पहिल्यांदाच त्सुनामीबाबत मोठा इशारा देण्यात आला असून येत्या काही दिवसांत भूकंपाचे आणखी धक्के जाणवण्याची शक्यता जपानच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, त्सुनामीचा व्हायरल व्हिडिओ 13 वर्षांपूर्वीचा आहे. 2011 मध्ये जपानच्या मियाको शहरात ही त्सुनामी आली होती. गेल्या आठवड्यात जपानमध्ये आलेल्या भूकंपानंतर जपानच्या हवामान विभागाने त्सुनामीबाबत इशारा दिला आहे. अद्याप तेथे त्सुनामी आलेली नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:त्सुनामीचा हा व्हायरल व्हिडिओ 13 वर्षांपूर्वीचा आहे; जुना व्हिडिओ नव्याने व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Misleading