गंगामाई साखर कारखान्यातील आगीत 70 कामगारांचा मृत्यू झालेला नाही; वाचा सत्य

False Social

अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बाभुळगावच्या गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी (25 फेब्रुवारी) सायंकाळी भीषण आग लागली होती. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झाले. 

या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, या दुर्घटनेत 70 पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) याविषयी फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, या दुर्घटनेत दोन कामगारांना किरकोळ जखमा झाल्या असून कोणाचाही मृत्यू झाला नाही. व्हिडिओसोबत चुकीच्या माहिती व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

31 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये कारखान्याला भीषण आग लागलेली दिसते. युजर्स हा व्हिडिओ शेअर करत दावा करत आहेत की, “गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट झाला असून 70 पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.”

मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

अहमदनगर जिल्ह्यातील गंगामाई साखर कारन्यात आग लागली होती परंतु, या दुर्घटनेत 70 जणांचा मृत्यू झाला असे कोणत्याही बातमीत म्हटलेले नाही. 

‘लोकमत’नुसार, या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले होते. 70 कामगारांचा मृत्यू झाला असता तरी ही नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, तसे काहीच आढळून येत नाही. 

एबीपी माझाशी बोलताना कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक रणजित मुळे म्हणाले की, आग लागली तेव्हा कारखान्यात 32 कर्मचारी होते. मोठा आवाज झाल्यानंतर ते सर्व बाहेर आले आणि या गोंधळात दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले असून कोणाचा मृत्यू झाला नाही.

याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने गंगामाई साखर कारखान्याशी संपर्क साधला. कारखाना व्यवस्थापनाने माहिती दिली की, या आगीत कोणात्याही कर्माचाऱ्याचा मृत्यू झाला नाही. आग लागल्यानंतर कारखान्यातून बाहेर पडताना दोन कामगार जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे.

शेवगाव पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, इथेनॉल युनिटमध्ये भीषण आग लागल्यानंतर सर्व कामकारांना त्वरीत बाहेर काढण्यात आले. यावेळी दोन जणांना किरकोळ लागले. त्यांच्यावर शेवगावच्या साईपुष्प रुग्णालयात उपचार करण्यात आले. गंगामाई साखर कारखान्यातील आगीत 70 जणांचा मृत्यू झाला हा सोशल मीडियावर केला जाणारा दावा खोटा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने मग साईपुष्प रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनीदेखील केवळ दोघे जण जखमी झाल्याचे सांगितले. आग लागल्यावर धावपळीत दोन कामगारांना काच लागली होती. त्यापैकी एकाला तीन टाके तर दुसऱ्याला एक टाका लावण्यात आला. या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, गंगामाई कारखान्याच्या दुर्घटनेत 2 कामगार किरकोळ जखमी झाले. या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे 70 जणांचा मृत्यू झाला ही खोटी माहिती आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गंगामाई साखर कारखान्यातील आगीत 70 कामगारांचा मृत्यू झालेला नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False