
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘औरंगजेब’ला त्यांचा भाऊ म्हणून संबोधतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपच्या माध्यमातून युजर्स त्यांच्यावर मुघल सम्राटाचे कौतुक केले म्हणून टीका करीत आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणअंती कळाले की, अर्धवट क्लिप व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे मुघल सम्राट औरंगजेबविषयी नाही, तर 2018 मध्ये शहीद झालेला जवान औरंगजेबबद्दल बोलत होते.
काय आहे दावा?
30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकेर म्हणतात की, “अगर अभी मैं बोलू कि वो मेरा भाई था, तो आप बोलोगे क्या आपको पता है उसका नाम क्या है. उसका नाम था औरंगजेब. होगा ना, मजहब से मुसलमान होगा. लेकिन उसने देश के लिए कुर्बानी दी. जिसको भारत माता की जय कहते है उसके लिए उसने अपनी जान तक दे दी. वो अपना भाई नहीं था?”
या व्हिडिओसोबत कॅप्शन दिलेली आहे की, “औरंगजेब ने भारत माता के लिए जान दी थी कांग्रेस के संपर्क में आने वाला हर इंसान पप्पु है।”
तथ्य पडताळणी
कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेली क्लिप उद्धव ठाकरेंनी नुकतेच मुंबईत 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या उत्तर भारतीय समाज मेळाव्यात केलेल्या एका भाषणातील आहे.
या कार्यक्रमात उद्धव ठाकेर यांनी भाजपच्या ‘हिंदुत्वा’ला फसवे आणि भेदाभेद करणारे अशी टीका केली. तसेच त्यांचे हिंदुत्व वेगळे आणि सर्वसमावेशक असल्याची भूमिका मांडली होती.
उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.
वरील व्हिडिओमधील मूळ भाषण ऐकल्यावर कळते की, उद्धव ठाकरे औरंगजेब नामक शहीद जवानाविषयी बोलत होते.
ते म्हणतात की, “एक अपना फौजी था, वो छुट्टी लेकर घर जा रहा था अपने परिवार से मिलने. आतंकवादीओं को जब ये पता चला तो उन्होंने उसे किडनैप किया. उसको दर्दनाक मौत दी. कुछ दिनों के बाद उसका शव कहीं पर मिला. वो अपना था कि नहीं था? उसने अपने देश के लिए कुर्बानी दी… अगर अभी मैं बोलू कि वो मेरा भाई था, तो आप बोलोगे क्या आपको पता है उसका नाम क्या है. उसका नाम था औरंगजेब. होगा ना, मजहब से मुसलमान होगा. लेकिन उसने देश के लिए कुर्बानी दी. जिसको भारत माता की जय कहते है उसके लिए उसने अपनी जान तक दे दी. वो अपना भाई नहीं था?”
यावरून स्पष्ट होते की, उद्धव ठाकरे मूळ भाषणात त्यांचे हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वापेक्षा कसे वेगळे आहे हे उलगडून सांगताना शहीद जवान औरंगजेब त्यांच्या भावासारखा असल्याचे म्हटले होते. ते मुघल सम्राट औरंगजेबबद्दल बोलत नव्हते.
मागच्या वर्षीदेखील ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेतून बोलताना त्यांनी औरंगजेब नावाच्या भारतीय लष्करातील जवानाचा प्रसंग सांगितला होता. देशासाठी शहीद होणारा भारतीय लष्कराचा जवान औरंगजेब हाही आमचाच आहे. देशासाठी प्राण देणारा प्रत्येक मुसलमान आमचाच असल्याचं त्यांनी म्हटले होते.
खाली दिलेल्या तुलनेमधून लगेच दिसते की, औरंगजेब भारतीय सैनिक असल्याचा संदर्भ व्हायरल क्लिपमधून वगळण्यात आलेला आहे.
कोण होता शहीद जवान औरंगजेब?
रायफलमॅन औरंगजेबचे 14 जून 2018 रोजी दहशदवाद्यांनी पुलवामा येथून अपहरण केले होते. काही दिवसांनंतर औरंगजेबचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. औरंगजेब दक्षिण काश्मीरमधील 44 बटालियन राष्ट्रीय रायफल्सचा सदस्य होता. त्याच्या मृत्यूनंतर तेरा महिन्यांनी त्याचे दोन्ही भाऊ सैन्यात भरती झाले. त्याचे वडीलही लष्करात होते.
निष्कर्ष
उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेब त्यांच्या भावासारखा असल्याचे म्हटले नाही. अर्धवट व्हिडिओ शेअर करून चुकीचा दावा पसरविला जात आहे. मूळ भाषणात उद्धव ठाकरे शहीद जवान औरंगजेबविषयी बोलताना त्याला भाऊ म्हटले होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:अर्धवट व्हिडिओ: उद्धव ठाकरे यांनी कोणत्या औरंगजेबला आपला भाऊ म्हटले? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: Misleading
