औरंगाबाद शहराचे नामांतर झाल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी रडून खंत व्यक्त केली नाही; जुना व्हिडिओ व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकारण | Politics

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. अनेक वर्षांपासून रखडलेला हा निर्णय पूर्णत्वास गेल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा रडू कोसळताणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, औरंगाबादचे नाव अधिकृतरीत्या छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर “हे फार वाईट घडलं” असे म्हणत ते रडले.

पडताळणीअंती कळले की, व्हायरल व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा असून त्याचा नामांतराशी काही संबंध नाही. 

काय आहे दावा ?

23 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत दाखवली आहे. यामध्ये ते म्हणतात की, “किती त्रास सहन करायचा माणसांनी? आयुष्यभर हेच सहन करायच का? हे फार वाईट घडलं आहे.”

‘कालच्या घटनेने आपल्याला दुःख झाले का?’ असा प्रश्न विचारल्यावर आव्हाड म्हणतात की, “साहेबांचा त्रास बघुन मला देखील त्रास आहे.” असे बोलल्यानंतर ते रडू लागतात. 

दावा केला जात आहे की, औरंगाबाद शहराच्या नामांतर प्रस्तावाला केंद्र सरकारची मुजरी मिळाल्यानंतर आव्हाड यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे. 

व्हिडिओ शेअर करत युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “औरंगाबादचे नाव आता छ. संभाजीनगर झालंय हे कळल्यावर लोकांची अवस्था.”

मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, मुलाखातीचा व्हायरल व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पारपडल्यानंतर त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून 23 नोव्हेंबर 2019 रोजी गुपचूप शपथविधी केला होता.

या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी बोलताना अजित पवारांच्या या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली आणि भावनेच्या भरात ते रडू लागले.

खालील व्हिडिओमध्ये आपण मुलाखत पाहू शकतात.

जितेंद्र आव्हाडांनी त्याच दिवशी एबीपी माझाशी संवाद साधला होता. नीट पाहिले तर लक्षात येईल, की व्हायरल व्हिडिओत आव्हाडांनी घातलेला शर्ट आणि एबीपी माझाच्या ट्विटमधील शर्ट एकच आहे.

तसेच आव्हाडांनी नामांतरावर अद्याप तरी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

मागील वर्षी देखील हा व्हिडिओ एडिट करुन शेअर केला गेला होता. ते रडण्याचे नाटक करत असल्याचा त्यावेळी दावा करण्यात आला होता. त्याचे फॅक्ट चेक आपण इथे वाचू शकता. 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, औरंगाबादचे नाव बदलले म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी खंत व्यक्त केल्याची ही प्रतिक्रिया नाही. व्हायरल व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा असून औरंगाबाद नामांतराशी त्याचा काही संबंध नाही.

Avatar

Title:औरंगाबाद शहराचे नामांतर झाल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी रडून खंत व्यक्त केली नाही; जुना व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading


Leave a Reply