तथ्य पडताळणीः बालाकोटमध्ये खरंच 200 दहशतवादी ठार झाले का?

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील बालाकोटवर हवाई हल्ला करून जैशचे प्रशिक्षण स्थळ उद्धवस्त केले होते. भारतीय वायू सेनेने 26 फेब्रुवारी रोजी केलेल्या या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी ठार झाले यावरून सध्या वाद सुरू आहे. भारत सरकार आणि सैन्याने मृतांचा अधिकृत आकडा दिलेला नसताना अगदी 400 पर्यंत दहशतवादी ठार झाल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या.

त्यातच आता बालाकोटमध्ये 200 दहशतवादी ठार झाल्याचा पुरावा मिळाल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानातील एका सामाजिक कार्यकर्त्यांने शेयर केलेल्या व्हिडियोच्या आधारावर पाकिस्तान सैन्य अधिकाऱ्याने बालाकोटमध्ये 200 दहशतवादी ठार झाल्याची कबुली दिल्याचे अनेक प्रतिष्ठित वृत्तस्थळांनी वृत्त दिले आहे.

सकाळने 13 मार्च रोजी ही बातमी फेसबुकवर पोस्ट केली होती. पडताळणी करेपर्यंत ही बातमी 567 वेळा शेयर आणि तिला तीन हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या होत्या. हीच बातमी अनेक मराठी वृत्तपत्रांनीदेखील दिलेली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

अर्काइव्ह

सकाळच्या बातमीत म्हटले की, 200 दहशतवाद्यांचे मृतदेह बालाकोटमधून खैबर पख्तुनख्वामध्ये नेण्यात आल्याची पाक सैन्याची माहिती अमेरिकेत असलेल्या गिलगीटमधील कार्यकर्त्याने केली ट्विट आहे. यामध्ये एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये, भारताने एअरस्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी 200 पेक्षा अधिक दहशतवाद्याना पुरल्याचे कबुल केले आहे.

बातमीमध्ये Senge Hasnan Sering या गिलगिट येथील कार्यकर्त्याचे खालील ट्विट दिले आहे. त्यात म्हटले की, व्हिडियोमध्ये पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याने बालकोट येथे भारताने केलेल्या हल्ल्यात 200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार केल्याचे मान्य केले आहे. पाकिस्तान सैन्याला साथ देणाऱ्या या  दहशतवाद्यांना हा अधिकारी मुजाहिद संबोधतो. तसेच त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचेही वचन देत आहे.

अर्काइव्ह

काय आहे व्हिडियोमध्ये?

2.20 मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये सुरुवातीला एक सैन्य अधिकारी गावकऱ्यांशी बोलताना दिसतो. तो म्हणतो,”अब हम सबका इमान है कि जो हकूमते वक्त के साथ खड़ा होकर लड़ाई करता है वो जिहाद है. त्यानंतर एका लहान मुलाला तो अधिकारी जवळ घेतो. त्या रडणाऱ्या मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करतो. नंतर दुसऱ्या मुलाला तो जवळ घेतो. मग 50 व्या सेकंदापासून बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागतो.

ज्यात म्हटले जाते की, अल्लाहच्या काही खास लोकांनाच शहिद होण्याचे भाग्य लाभते. प्रत्येकाच्या नशिबी ते नसते. तुम्हाला तर माहितच आहे, सुमारे 200 लोक वर गेले होते. पण केवळ याच्याच नशीबात शहीद होण्याचे भाग्य होते. आमच्या नशिबात ते नव्हते. आम्ही रोज वर चढतो, उतरतो. पण अल्लाहची कृपादुष्टी ज्यांच्यावर असते, त्यांनाच शहीद होण्याचे भाग्य लाभते.

यानंतर हा अधिकारी एका ज्येष्ठ व्यक्तीचे सांत्वन करू लागतो.

तथ्य पडताळणी

Senge Hasnan Sering यांच्या मूळ ट्विट खालील कमेंट्समध्ये फॅक्ट क्रेसेंडोला फरान जेफरी या युजरने ट्विट केलेली युट्यूब व्हिडियोची लिंक आढळली. 2 मार्च रोजी UTV Utman नामक युट्यूब चॅनेलने हा व्हिडियो अपलोड केला होता. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

या व्हिडियोला उर्दू भाषेतून –  ڈپٹی کمانڈنٹ کرنل حلیم شینگآڑہ درہ بیلہ چیند میں شہید احسان اللہ کا گھر آمد ۔    – असे नाव दिले आहे. हे मूळ उर्दू नाव आम्ही गुगलमध्ये जशासतसे सर्च केले.

तेव्हा बारवाल युथ फोर्स नामक एक फेसबुक पेज आढळले. या पेजवर आम्हाला  – شینگاڑہ درہ نیوز – या पेजच्या शेयर केलेल्या पोस्ट दिसल्या. मग आम्ही त्या पेजला भेट दिली.

या फेसुबक पेजच्या उर्दु नावाचे इंग्रजी भाषांतर – Shingara Darra News – असे होते. या पेजवर आम्हाला खालील व्हिडियो आढळला.

अर्काइव्ह

गिलगिट येथील कार्यकर्ते Senge Hasnan Sering यांनी 12 मार्च रोजी ट्विट केलेला व्हिडियो आणि Shengara Darra News या फेसबुक पेजने 2 मार्च रोजी शेयर केलेला व्हिडियो सारखाच आहे.

म्हणजे याचा आणि बालाकोट हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचा काही संबंध नाही.

मग हा व्हिडियो आहे तरी कोणाचा?

या फेसबुक पेजवर आम्हाला खालील पोस्ट आढळली.

अर्काइव्ह

वरील पोस्ट एक मार्च रोजी करण्यात आली होती.  फॅक्ट क्रेसेंडोच्या भाषांतरकाराने यातील उर्दू मजकुराचे भाषांतर केले. त्याचा मतितार्थ पुढील प्रमाणे, Shingara Darra गावामध्ये आज (1 मार्च) शहिद एहसानुल्लाह यांचा नमाज-ए-जनाजा पार पडला. बलुच कर्नल फैसल कुरैशी आणि मेजर नौमान यांची उपस्थिती होती. पाकिस्तान सैन्याने शहिद एहसानुल्लाह यांना सलामी दिली. कर्नल कुरैशी यांनी अनाथ मुलांची जबाबदारी घेणार असल्याचे घोषित केले. एहसानुल्लाह हे पाकिस्तान सैन्यात होते आणि त्यांचा नाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

तसेच 28 फेब्रुवारी रोजीदेखील याच पेजवरून खालील पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये म्हटले की, दुःखद बातमी – एहसानुल्लाह यांचे Nao, Shingara Darra येथे हार्ट अटॅकने निधन झाले. ते इनायतुल्लाह यांचे बंधु होते.

अर्काइव्ह

यावरून हे स्पष्ट होते की, वरील व्हिडियो हा एहसानुल्लाह नामक एका पाकिस्तानी सैनिकाचा असून त्याचा 28 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तो Shingara Darra या गावातील होता. खाली त्यांचा फोटो आहे.

अर्काइव्ह

Shingara Darra हे गाव खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या अपर दिर या डोंगराळ भागातील आहे. विशेष म्हणजे बालाकोट आणि अपर दिर यामध्ये सुमारे 400 किलोमीटरचे अंतर आहे. बालाकोट भारताच्या सीमेकडे आहे तर, अपर दिर अफगाणिस्तान सीमेजवळ आहे.

राहिली गोष्ट व्हिडियोतील संवादाची तर, 50 व्या सेकंदापासून ऐकु येणाऱ्या आवाजामध्ये कुठेही 200 दहशतवादी ठार झाल्याचे किंवा बालाकोटचा उल्लेख केलेला नाही. तसेच समोर दिसणारा – कर्नल फैसल कुरैशी  – सैन्य अधिकारीही बोलत नाही. हा आवाज कोणाचा आहे हे व्हिडियोतून स्पष्ट होत नाही.

व्हिडियोत “200 बंदे ऊपर गए थे… हम रोज़ाना चढ़ते है, जाते है, आते है” असे म्हटले आहे. आता हे गाव डोंगराळ भागातील आहे. पाकिस्तानी सैन्य या सीमावर्ती भागात सतत पहारा देत असते. यादृष्टीने विचार केला तर, 200 जणांची तुकडी डोंगरावर जाण्याच्या संदर्भात ही गोष्ट बोललेली असावी. “उपर गए” म्हणजे मेले, असा अर्थ येथे होत नाही. व्हिडियोतील संवादाचा Senge Hasnan Sering यांनी विपर्यास केला आहे.

तसेच एएनआय या वृत्तसंस्थेला Senge Hasnan Sering यांनी स्पष्ट सांगितले होते की, त्यांना या व्हिडियोच्या सत्यतेबाबत खात्री नाही.

निष्कर्ष

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे सिद्ध होते की, गिलगिटच येथील कार्यकर्ते Senge Hasnan Sering यांनी ट्विट केलेल्या व्हिडियोमध्ये 200 दहशतवादी ठार झाल्याचे कुठेही म्हटलेले नाही. तसेच हा व्हिडियो खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या Shingara Darra गावातील एहसानुल्लाह या पाकिस्तानी सैनिकाच्या दफनविधीच्या वेळीचा आहे. त्यामुळे सकाळने या ट्विटच्या आधारे दिलेली बातमी असत्य ठरते.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः बालाकोटमध्ये खरंच 200 दहशतवादी ठार झाले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •