FACT CHECK: ABP न्यूजचे बनावट ग्राफिक्स वापरून छगन भुजबळ यांचा खोटा माफीनामा व्हायरल

False राजकीय | Political

सोशल मीडियावर सध्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या माफीनाम्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. “छगन भुजबळ यांचा जाहीर माफीनाम्यातून गौप्यस्फोट” असे म्हणून एबीपी न्यूजने बातमी दिल्याचा बनाव या व्हिडियोमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

व्हिडियोमधील कथित माफीनाम्यात छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्या लोकसभा उमेदवारीमुळे व्यथित होऊन जनतेची माफी मागितली आहे. तसेच त्यांनी आर्थिक घोटाळा केल्याचेही मान्य केले आहे. तसेच जनतेला विचार करून मतदान करण्याचेही त्यांनी आवाहन केले. यूजरने हा व्हिडियो शेयर करताना लिहिले की, खूप झाला छळ, आता नको भुजबळ.

काय लिहिले आहे माफीनाम्यात?

महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी अत्यंत महत्त्वाची पदे भूषविलेला नेता म्हणून आपल्या सर्वांना मी परिचित आहे. गेली 3 वर्षे मी आर्थिक घोटाळ्यांमुळे जेलमध्ये होतो.

जनतेच्या पैशाची अफरातफर करण्याचा अक्षम्य प्रमाद माझ्या हातून घडला आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्यावर तसेच माझा मुलगा पंकज भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ यांचाही या सर्व घोटाळ्यात महत्त्वाचा सहभाग आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ यांनी निवडणुकीसाठी भरलेल्या अर्जाबद्दल कळल्यानंतर मला स्वतःचीच लाज वाटली. याच कारणामुळे मी इतके दिवस माध्यमांसमोर आलो नव्हतो. ज्या जनतेने मला निवडूण दिले त्यांच्या विश्वासाला पात्र न होता, मी महाराष्ट्रातील सामान्य जनतेला लुबाडले याची मला लाज वाटते आहे. म्हणूनच सुज्ञ मतदारांनी मत देताना विचारपूर्वक मतदान करावे.

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यास अनेक विसंगती आढळतात. व्हिडियोमध्ये ABP न्यूजचा लोगो आणि वेबसाईट दिली आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, ABP न्यूज ही हिंदी वृत्तवाहिनी आहे. मग तिच्यावर छगन भुजबळ यांच्या माफीनाम्याची बातमी मराठीतून कशी असेल?

व्हिडियोमध्ये गौप्यस्फोट हा शब्द चुकीच्या पद्धतीने “गौप्यस्पॉट” असा लिहिला आहे. व्हिडियोच्या शेवटी ABP माझा या मराठी वृत्तवाहिनीचा लोगो वापरण्यात आला. कोणतेही न्यूज चॅनेल अशी चूक करणार नाही. त्यामुळे एबीपी न्यूजचे ग्राफिक्स वापरून हा बनावट व्हिडियो तयार करण्यात आला आहे.

मग छगन भुजबळ यांनी माफीनामा प्रसिद्ध केला का?

महाराष्ट्र टाईम्सने 29 एप्रिल रोजी दिलेल्या बातमीनुसार, छगन भुजबळ यांच्या नावाने खोटी बातमी सोशल मीडियामधून दाखवली जात असल्यामुळे त्यांनी याबाबत तक्रार दिली आहे. “बनावट क्लिपमध्ये उल्लेख असलेल्या कुठल्याही प्रकारचे पत्र किंवा माफीनामा मी दिलेला नाही”, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स

वेबदुनिया वेबसाईटच्या बातमीमध्ये म्हटले की, ए.बी.पी माझा या मराठी वृत्तवाहिनीचा लोगो व ग्राफिक्सचा गैरवापर करून बनावट व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला जात असून याबाबत कारवाई करण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – वेबदुनियाअर्काइव्ह

छगन भुजबळ यांनी पोलीस आयुक्तांना दिलेला मूळ पत्र तुम्ही खाली वाचू शकता

निष्कर्ष

ABP न्यूज या वृत्तवाहिनीचे ग्राफिक्स वापरून तयार करण्यात आलेला सदरील व्हिडियो बनावट आहे. छगन भुजबळ यांनी कुठल्याही प्रकारचा माफीनामा दिलेला नसून, हा खोटा व्हिडियो पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे.

Avatar

Title:FACT CHECK: ABP न्यूजचे बनावट ग्राफिक्स वापरून छगन भुजबळ यांचा खोटा माफीनामा व्हायरल

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False