
कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असताना कोरोनापासून बचाव करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चुकीचे उपाय सांगणारे व्हिडियो आणि मेसेजचे प्रमाण वाढत आहे. अशाच एका व्हिडियोमध्ये मीठाच्या पाण्याने गुळणा केल्याने कोरोनापासून रक्षण होते असा उपाय सुचविण्यात आलेला आहे. व्हिडियोतील व्यक्ती कस्तुरबा हॉस्पिटलचे डीन असल्याचा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता व्हिडियोतील व्यक्ती कस्तुरबा हॉस्पिटलचे डीन नसल्याचे स्पष्ट झाले.
काय आहे व्हिडियोमध्ये?
34 सेकंदाच्या या व्हिडियोमध्ये मास्क लावलेला एक व्यक्ती सांगतो की, आतापर्यंतच्या माहितीनुसार कोरोना विषाणू शरीरात जाण्यापूर्वी गळ्यात 4 दिवस राहतो. त्यामुळे मीठाच्या पाण्याने गुळणा केल्याने कोरोना नष्ट होतो.
व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, हे कस्तुरबा हॉस्पिटलचे डीन आहेत.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर कळते की, हा सुभाष ए. यादव नावाच्या टिकटॉक युजरच्या अकाउंटवरील हा व्हिडियो आहे. सुभाष यादव हे कस्तुरबाचे डीन नाहीत. सदरील व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी तो डिलीट केला. सुभाष यांनी जी साउंड बाईट वापरून हा व्हिडियो तयार केला होता, टिकटॉकने ती देखील डिलीट केली आहे.

मूळ अकाउंटला येथे भेट द्या – टिकटॉक
मग व्हिडियोतील उपायांचे काय?
व्हिडियोमध्ये सांगितलेले उपायदेखील चुकीचे आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आघाडीच्या वैद्यकीय संस्थांनी स्पष्ट केले आहे की, मिठाच्या कोमट पाण्याने गुळणा केल्याने कोरोना नष्ट होत नाही. असे केल्याने कोरोनापासून रक्षणही होत नाही.

मूळ वेबसाईट येथे पाहा – Johns Hopkins Medicine । WHO Myth Buster
निष्कर्ष
यावरून हे स्पष्ट होते की, कस्तुरबा हॉस्पिटलच्या डीनच्या नावे कोरोनापासून बचावाचे चुकीचे उपाय सांगितले जात आहे. हा व्हिडियो कस्तुरबा हॉस्पिटलच्या डीनचा नाही. तो सुभाष यादव नामक एका युजरने टिकटॉकवर तयार केला होता.

Title:कोरोनावर चुकीचे उपाय सांगणारे हे कस्तुरबा हॉस्पीटलचे डीन नाहीत; पाहा सत्य काय आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False
