सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे खोटे फोटो व्हायरल, वाचा सत्य

False राजकीय राष्ट्रीय
 • 18
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  18
  Shares

काँग्रेसच्या काळात एक पदरी असणारा सोलापूर-तुळजापूर हायवे भाजप सरकारच्या काळात चार पदरी झाल्याचा दावा पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ या फेसबुक पेजवरील एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. यासाठी दोन फोटोंची तुलना केलेली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे.

अर्काइव्ह

पडताळणी करेपर्यंत सदरील पोस्ट 2565 वेळा शेयर करण्यात आली आहे. तसेच तिला 4700 पेक्षा जास्त लाईक्स मिळालेल्या आहेत. “बदल घडलाच” असे म्हणत “#विकास” आणि “#पुन्हानरेंद्र” असे हॅशटॅगदेखील दिले आहेत.

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम भाजप सरकारच्या काळात तयार करण्यात आलेला सोलापूर-तुळजापूर महामार्ग म्हणून दिलेल्या फोटोला गुगल रिव्हिर्स इमेज सर्च केले.

वरील फोटो विविध संकेतस्थळांनी वापरल्याचे दिसून आले. भारतातील महामार्गांविषयीच्या बातम्यांमध्ये हा फोटो प्रातिनिधिक छायाचित्र म्हणून वापरण्याच येतो. E-Vartha वर 2014 साली एका आर्टिकलमध्ये हा फोटो वापरलेला आहे. तो लेख तुम्ही येथे वाचू शकता – E-Varthaअर्काइव्ह

स्वराज्य या संकेतस्थळावर 2017 साली एका आर्टिकलमध्ये हा फोटो वापरण्यात आला असून त्याखाली दिलेल्या कॅप्शनमध्ये हा फोटो एरोड आणि कोईम्बतूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 544 या मार्गाचा असल्याचे म्हटले आहे. तसेच या फोटोचा स्रोत म्हणून श्रीकांत रामकृष्णन आणि विकिमीडिया कॉमन्स यांचे नाव आहे.

हा मूळ आर्टिकल तुम्ही येथे वाचू शकता – स्वराज्यअर्काइव्ह

येथून संदर्भ घेऊन मग आम्ही गुगल इमेजसवर – Erode and Coimbatore Highway – असा शोध घेतला.  तेव्हा विकिपीडियावरील चितोड या तमिळनाडूमधील शहरासंबंधीच्या पेजवर हा फोटो वापरण्यात आल्याचे आढळले. त्यातील माहितीवरून हे स्पष्ट होते की हा फोटो सालेम (तमिळनाडू) आणि कोची (केरळ) यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 47 (नवीन एनएच 544) चा आहे.

हा फोटो आर-श्रीकांत नामक एका युजरने 10 नोव्हेंबर 2011 साली विकिपीडियावर अपलोड केला होता. हा फोटो सालेम-कोची हायवेवरील चितोड जंक्शन पुलावरून काढलेला आहे. त्या जागेचे लोकेशन तुम्ही गुगल अर्थवर पाहू शकता.

वरील मूळ फोटो हाय रेझ्युलेशनमध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा – एनएच 544अर्काइव्ह

यावरून हे सिद्ध होते की, सदरील फोटो सोलापूर-तुळजापूर हायवेचा नसून तो 2011 साली काढलेल्या सालेम-कोची महामार्गाचा आहे. तो महाराष्ट्रातून जात नाही.

मग आम्ही काँग्रेसच्या काळातील एक पदरी मार्ग म्हणून दाखवलेल्या फोटोची पडताळणी केली. तो फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला असता आश्चर्यकारक तथ्य समोर आले.

हा रोड सोलापूर-तुळजापूर हायवे तर नाहीच, पण तो भारतातीलसुद्धा नाही. हा फोटो चक्क इंग्लंडमधील सालसबेरी-अ‍ॅम्सबेरी दरम्यानच्या जून्या मार्गाचा आहे.

सेबर रोडस यूके या संकेतस्थळावर हा मूळ फोटो आहे. येथे दिलेल्या माहितीनुसार, हा मार्ग ए-345 क्रमांकाचा जूना रोड आहे. नवीन मार्ग ए-303 सुरू झाल्यावर तो 1960 साली बंद करण्यात आला होता. परंतु, आता ए-345 पुन्हा सुरू झाला असून हा जूना रोड त्याचा साईड रोड बनला आहे. सदरील फोटो 15 जून 2013 रोजी काढण्यात आलेला आहे. (अर्काइव्ह)

हा रस्ता गुगल अर्थवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा – गुगल अर्थ

मूळ फोटा हाय रेझ्यूलेशनमध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा – ए-345अर्काइव्ह

वरील फोटो झूम केला असता त्यात दिसणाऱ्या कारचा क्रमांक  – SK58 XPJ – असल्याचे कळते. ती फोर्ड कंपनीची सिल्वर रंगाची कार आहे. गाडी क्रमांकावरूनही सिद्ध होते की हा रस्ता इंग्लंडमधील आहे.

आता दोन्ही फोटोंमधील रस्त्यांची तुलना पाहू.

मग सोलापूर-तुळजापूर महामार्गाचे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी 2019 रोजी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या एनएच-211 (52) या चार पदरी रस्त्याचे लोकार्पण केले होते. सोलापूर-येडशी दरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण प्रकल्पाचा तो एक भाग होता. पीआयबी इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर तुम्ही या रस्त्याची झलक पाहू शकता.

निष्कर्ष

सदरील पोस्टमध्ये दिलेले फोटो सोलापूर-तुळजापूर महामार्गाचे नाही. त्यातील एक फोटो इंग्लंडमधील तर दुसरा तमिळनाडूमधील आहे. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. ही पोस्ट असत्य आहे

Avatar

Title:सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे खोटे फोटो व्हायरल, वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 • 18
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  18
  Shares