नीता अंबानी राम मंदिरासाठी 33 किलोचे 3 सुवर्ण मुकुट देणार आहेत का? वाचा सत्य

False सामाजिक

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक निराधार दावे केले जातात. यात भर म्हणजे म्हटले जात आहे की, नीता अंबानी आयोध्यातील राम मंदिरासाठी 33 किलो वजनाचे तीन सुवर्ण मुकुट देणार आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य आढळला.

काय आहे दावा ? 

मुकेश व नीता अंबानी यांचा फोटो शेअर करून म्हटले की, “श्रीमती नीता मुकेश अंबानी यांच्यातर्फे आयोध्या नगरीतील प्रस्तावित राम मंदिरातील मूर्तींवर चढविण्यासाठी 33 किलो वजनाचे सोन्याचे 3 मुकुट भेट देण्यात येणार आहेत.”

मूळ फोटो – फेसबुकआर्काइव्ह 

तथ्य पडताळणी 

नीता अंबानी यांनी अशी काही घोषणा केली का याचा शोध घेतला. इंटरनेटवर अशी कोणतीही बातमी आढळली नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने मग रिलायन्स कंपनीच्या मीडिया विभागाशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगत म्हटले की, “नीता अंबानी यांच्याविषयक केला जाणारा दावा निराधार आणि असत्य आहे. अशा कोणत्याही प्रकारचे दान त्यांच्यातर्फे करण्यात येणार नाही. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.”

यानंतर आम्ही राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे डॉ. अनिल मिश्रा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, “अशा प्रकाचे दान करण्यापूर्वी आम्हाला पूर्वसूचना दिली जाते. नीता अंबानी असे काही दान करणार असल्याचे आम्हाला अद्याप कळविण्यात आलेले नाही.”

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, नीता अंबानी राम मंदिरातील मूर्तींसाठी 33 किलो वजनाचे तीन सुवर्ण मुकुट देणार असल्याची निव्वळ अफवा आहे.

Avatar

Title:नीता अंबानी राम मंदिरासाठी 33 किलोचे 3 सुवर्ण मुकुट देणार आहेत का? वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: False