एलॉन मस्कने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवल्याचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

एलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विटरची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी येताच ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी केली.

यानंतर सोशल मीडियावर वावड्या उठू लागल्या की, मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवली. एवढेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रक काढून स्वतः माहिती दिली, असा देखील दावा करण्यात येत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, ही खोटी माहिती आहे. ट्विटरने अद्याप ट्रम्प यांच्यावरील बंदी मागे घेतलेली नाही. 

काय आहे दावा?

एएनआय वृत्तसंस्थेने डोनाल्ड ट्रम्प यांच्या कथित पत्रकाचा फोटो शेअर केला होता ज्यामध्ये म्हटले होते की, ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंटर सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 

मूळ पोस्ट – ट्विटरट्विटर

फेसबुकवर लेट्सअप मराठीने दावा केला होता की, “एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवली.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी खरंच मागे घेण्यात आली का याचा शोध घेतला. कोणत्याही मीडिया वेबसाईटवर तशी अधिकृत बातमी सापडली नाही. जर खरंच ट्विटरने असा काही निर्णय घेतला असता तर नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, असे काहीच आढळले नाही. 

तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने व्हायरल होत असलेले पत्रकसुद्धा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील उपलब्ध नाही. 

अधिक शोध घेतला असता आम्हाला ट्रम्प यांचे माजी प्रचारप्रमुख ब्रॅड पार्स्केल यांचे ट्विट आढळले. यामध्ये त्यांनी व्हायरल पत्रक शेअर करून म्हटले की, “हे फेक आहे.”

ट्रम्प यांचे विद्यमान संपर्कप्रमुख टेलर बुडोविच यांनीसुद्धा पार्स्केल यांचे ट्विट रिट्विट करीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने व्हायरल होत असलेले पत्रक खोटे असल्याचे सांगितले. 

मूळ पोस्ट – ट्विटर

ट्विटरनेदेखील ट्रम्प यांचे अकाउंट पुन्हा सुरू करण्याविषयी कोणताही निर्णय जाहीर केलेले नाही. 

उलट मस्क यांनी ट्विटर करीत माहिती दिली की, “बंदी घातलेले अकाउंट पुन्हा सुरू करण्याविषयीचा निर्णय सल्लागार समिती गठित झाल्यानंतर घेण्यात येईल.”

अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेत ट्रम्प समर्थकांनी 6 जानेवारी 2021 रोजी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत धुडगूस घालत हिंसाचार केला होता. समर्थकांना भडविल्यामुळे ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट कायमचे निलंबित केले होते. 

मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचा मनोदय व्यक्त केल्यापासून ट्रम्प यांची ट्विटरवर वापसी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप तरी असा काही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

ट्रम्प यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये ट्विटरवर परत येणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले होते. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी मागे घेण्यात आलेली नाही. व्हायरल दावा असत्य आहे. तसेच ट्रम्प यांच्या नावाने व्हायरल होत असलेले ते पत्रकसुद्धा बनावट आहे. (तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:एलॉन मस्कने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवल्याचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False