ऋषी सुनक यांनी हिंदु पद्धतीने पंतप्रधान निवासात प्रवेश केल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य 

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकारण | Politics

इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नीसह पंतप्रधान निवासस्थानात हिंदू पद्धतीने पूजा करून गृहप्रवेश केला, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऋषी सुनक व त्यांची पत्नी अक्षता यांच्यासोबत भगवे कपडे परिधान धार्मिक लोक दिसतात. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला आहे. हा व्हिडिओ सुनक यांनी दोन महिन्यांपूर्वी इस्कॉन मंदिराला दिलेल्या भेटीचा आहे. 

काय आहे दावा ?

या व्हिडिओमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक पत्नीसह दर्शन घेत आहेत. युजर्स दावा करत आहे की, या व्हिडिओमध्ये ऋषी सुनक पंतप्रधान निवासस्थानात म्हणजेच डाउनिंग स्ट्रीटवरील घर क्रमांक दहामध्ये हिंदू पद्धतीने पूजा करुन गृहप्रवेश केला आहे. 

पोस्टमध्ये लिहिलेले आहे की, “ब्रिटनचे नवीन पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पत्नी सह गृह प्रवेश।”

फेसबुक

तथ्य पडताळणी

या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी कीवर्ड सर्च केले. त्यातून द इंडियन इक्सप्रेस वृतपत्राची एक बातमी सापडली. त्यानुसार ऋषी सुनक यांनी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त 19 ऑगस्ट 2022 रोजी इंग्लंडमधील इस्कॉनच्या भक्तिवेदांत कृष्ण मंदिराला भेट दिली होती.  

तसेच ऋषी सुनक यांनीसुद्धा ट्विटर अकांउटवर या भेटीचा फोटो शेअर केला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये सुनका यांचे कपडे आणि खाली दिलेल्या फोटोतील कपडे सारखेच आहेत.   

हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर इस्कॉन भक्तिवेदांत कृष्ण मंदिराच्या फेसबुक अकाउंटवर सुनक यांच्या भेटीचे इतर फोटो सापडले. व्हायरल क्लिप आणि इस्कॉन मंदिराच्या फेसबुकवर शेअर केलेले फोटो यांमध्ये खूप साम्य आहे.

व्हायरल व्हिडिओतील दृश्य आणि इस्कॉन मंदिराच्या फेसबुक अकाउंटवरील फोटोंची तुलना केली असता ही बाब आणखी स्पष्ट होते.

व्हिडिओमध्ये सुरुवातील सुनक यांच्याशी बोलणारा व्यक्ती फोटोंमध्येसुद्धा दिसतो. तसेच सुनक व त्यांच्या पत्नीला माहिती सांगणारी महिलासुद्धा दोन्हींमध्ये दिसते. 

निष्कर्ष 

यावरुन सिद्ध होते की, हा व्हिडिओ ऋषी सुनक यांच्या पंतप्रधान निवास्थानातील गृहप्रवेशाचा नाही.  कृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉन मंदिराला दिलेल्या भेटीचा दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:ऋषी सुनक यांनी हिंदु पद्धतीने पंतप्रधान निवासात प्रवेश केल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate  

Result:Misleading