हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी भाजप खासदाराला काळे फासले का? वाचा व्हिडियोमागचे सत्य

False राजकीय | Political

नव्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यांवर उतरले असून, काही ठिकाणाला आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, संतप्त शेतकऱ्यांनी भाजप खासदार राजकुमार सैनी यांच्या तोंडाला काळे फासले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्या आढळला. हा व्हिडियो चार वर्षांपूर्वीचा म्हणजे 2016 मधील आहे.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सोशल मीडियावरील व्हायरल क्लिपमध्ये काही लोक एका व्यक्तीच्या तोंडाला काळे फासताना दिसतात. सोबत दावा केला जात आहे की, “हरियाणाच्या जाटांनी भाजपा खासदार सैनी यांचे तोंडाला काळे फासले, खेटरांनी पुजा केली ही बातमी कुठल्याही चॅनलने नाही दाखवली.”

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम कीवर्ड्च्या मदतीने गुगलवर या व्हिडियोबद्दल शोधले. त्यातून टाईम्स ऑफ इंडियाची 2016 मधील एक बातमी समोर आली. त्यानुसार, कुरुक्षेत्र येथील तत्कालिन भाजप खासदार राजकुमार सैनी जाट आरक्षणाचा विरोध केला म्हणून त्यांच्यावर पाच जणांनी हल्ला करीत चेहऱ्यावर शाई फेकली होती. 

या प्रकरणी पाच जणांना कलम 307 अंतर्गत खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपींपैकी एक वकिल तर इतर चौघे विद्यार्थी होते.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया 

हा धगा पकडून अधिक शोध घेतला असता पंजाब केसरीने या घटनेचा व्हिडियो शेयर केल्याचे आढळले. तसेच सोबतच्या बातमीनुसार, पाचही आरोपी हिसारमधील बुढाना गावातील रहिवासी आहेत. 16 ऑक्टोबर 2016 रोजी खासदार सैनी एका कार्यक्रमातून बाहेर पडत असताना काही तरुणांनी सेल्फी काढण्याचे निमित्त करून घेराव घातला. त्यानंतर त्यांनी चप्पल बुटांनी मारहाण केली तसेच सैनी यांच्या चेहऱ्यावर शाई लावली.

विशेष म्हणजे राजकुमार सैनी सध्या भाजपमध्ये नाहीत 2018 साली त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

निष्कर्ष

चार वर्षांपूर्वीचा जुना व्हिडियोला सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी जोडण्यात येत आहे. खासदार सैनी यांनी काळे फासण्याचा हा व्हिडियो 2016 मधील आहे. जाट आरक्षणाला विरोध केला म्हणून काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला होता. 

Avatar

Title:हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी भाजप खासदाराला काळे फासले का? वाचा व्हिडियोमागचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False