
‘लव्ह जिहाद’बाबतचे रेट कार्ड असल्याचा दावा करत सध्या समाजमाध्यमात सांजा लोकस्वामी या दैनिकाचे कात्रण व्हायरल होत आहे. हे खरं आहे ..पनवेल मध्ये खूप मुस्लिम अटक केलेत..एक मोठ्ठं रॅकेट होत..पण अजूनही किती निरागस हिंदू मुली बळी गेल्यात त्यांना ..देशाबाहेर पाठवण्यात आले….अजूनही तुम्ही जागे होणार नाही.. तुमची मुलगी बहीण..जेव्हा जाईल तेव्हा डोळे उघडतील का… अशा माहितीसह स्मिता गणवे यांनीही हे वृत्तपत्राचे कात्रण पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
पनवेलमध्ये हिंदू मुलींना देशाबाहेर पाठविण्यात आल्याचे कोणते रॅकेट उघडकीस आले का, याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी असे कोणतेही वृत्त आम्हाला दिसून आले नाही. सांजा लोकस्वामी वृत्तपत्रही येथून प्रकाशित होत असल्याचे आम्हाला दिसून आले नाही. त्यानंतर आम्ही या वृत्तपत्राचे कात्रण रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी हे आम्हाला जो परिणाम मिळाला त्यात अभिनेत्री कोयना मित्रा हिचे 4 ऑगस्ट 2018 रोजीचे एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये आम्हाला तेच वृत्तपत्राचे कात्रण दिसून आले. मित्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राजनाथ सिंह यांना टॅग करत याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
यापूर्वी या कात्रणाचे अल्ट न्यूज या संकेतस्थळाने केले असून त्यानुसार वृत्तपत्राचे हे कात्रण फोटोशॉप केलेले आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात असा काही गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट केले. यातून खूप मुस्लीम अटक केलेत. मोठं रॅकेट आहे. निरागस हिंदू मुली बळी गेल्यात. त्यांना देशाबाहेर पाठवण्यात आले हे दावे असत्य असल्याचेही स्पष्ट झाले.
निष्कर्ष
पनवेलमध्ये खूप मुस्लीमांना अटक करण्यात आली आणि मुलींना देशाबाहेर पाठविण्यात आल्याचा दावा असत्य आहे. वृत्तपत्राचे हे कात्रणही फोटोशॉप केलेले आहे.

Title:पनवेलमध्ये ‘लव्ह जिहाद’ पुकारण्यात आल्याचा दावा खोटा, वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
