चॉकलेटमध्ये 4 टक्के झुरळ असतात का? वाचा त्या व्हायरल मेसेजमागील सत्य

False वैद्यकीय

चॉकलेट न खाण्याविषयी अधूनमधून एखादा मेसेज व्हायरल होतच असतो. अशाच एका मेसेजमध्ये आपण खात असललेल्या चॉकलेटमध्ये 4 टक्के झुरळ असतात असे सांगितले जाते. चॉकलेट तयार करण्यासाठी लागणाऱ्या “चोको” मध्ये 4 टक्क्यांपर्यंत झुरळ राहू देण्याचे परवानगी फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) या संस्थेतर्फे देण्यात येते. झुरळामुळे फुफ्फुसाची प्रतिकारशक्ती कमी होते तसेच सर्दी, खोकला दमा असा त्रासदेखील होऊ शकतो. त्यामुळे चॉकलेट खायचे नाही याचा विचार करावा, असे आवहन मेसेजेमध्ये करण्यात आला आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केल्यावर कळाले की, हा मेसेज चुकीची आणि अर्धवट माहिती देत आहे.

काय आहे मेसेमध्ये?

FDA (फूड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन) ही संस्था चॉकलेट मधील चोको मध्ये 4 % झुरळांना परमिशन देते . 

चॉकलेट बनवण्यासाठीचे चोको बटर बनवावे लागते. त्यासाठी चोकोचे फरमेंटेशन करावे लागते. ही  फरमेंटेशन प्रोसेस करत असताना त्याचा जो वास येतो तो झुरळांना खूप आवडतो व त्याकडे ती attract होतात व त्यामध्ये पडतात. ती त्यामधून बाहेर काढणे अशक्य आहे,असे निदर्शनास आल्यानंतर चोको बनवणाऱ्या कंपन्यांनी लीगली आम्हाला या झुरळांसाठी परमिशन द्या. अशी मागणी केल्यावर त्याचा स्टॅंडर्ड म्हणून ४ % झुरळे त्यामध्ये असण्याला मान्यता देण्यात आली. ही झुरळे फुफ्फुसांची प्रतिकार शक्ती कमी करतात. तसेच चिकट असल्यामुळे सर्दी कफ दमा याला कारणीभूत ठरतात . 

एका 100 ग्रॅम चॉकलेटमध्ये जवळपास 16 झुरळे असणे हे नॉर्मल आहे. तेव्हा तुम्हीच ठरवा… चॉकलेट खायचे की नाही ते…

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक 

एक महिलादेखील वरीलप्रमाणे माहिती इंग्रजीतून देतानाचा व्हिडियोदेखील युजर्स शेयर करीत आहेत.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

आपल्या देशात Food Safety and Standards Authority of India (FSSAI) अर्थातच भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे खाद्यपदार्थांची तपासणी, निर्मिती, साठवणूकीचे मापदंड, निर्मितीप्रक्रिया, विक्री नियमन आदी कामे ‘एफएसएसएआय’तर्फे करण्यात येते. त्यामुळे भारतात चॉकलेटमध्ये झुरळ असण्याला परवानगी आहे का याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवरच मिळेल. तेथे भेट दिली असता कळाले की, ही माहिती खोटी आहे.

‘एफएसएसएआय’तर्फे चॉकेलटमध्ये किटक किंवा इतर दुषित घटकांना मान्यता असल्याचा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यात लिहिले की, ‘एफएसएसएआय’च्या मानकांनुसार, चॉकलेटमध्ये किडे-कीटक आणि इतर दुषित घटक नसावेत. ‘एफएसएसएआय’तर्फे चॉकलेटमध्ये कीटक राहु देण्याची परवानगी देण्यात आल्याची केवळ अफवा आहे. 

मूळ वेबसाईटला भेट द्या – MYTH BUSTERS 

खाद्य सुरक्षा आणि मानक नियमन 2011 च्या 2.7.4 मध्ये चॉकलेट तयार करण्यासंबंधी नियमावली दिली आहे. त्यानुसार, चॉकलेट तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ दुर्गंधी, कीटक, बुरशी, कचरा, भेसळ आणि इतर हानीकाररहित असावेत. अधिक सविस्तर येथे वाचा  – PDF

याचा अर्थ सरळ आहे की, भारतात चॉकलेटमध्ये झुरळ असण्याची परवानगी नाही.

मग FDA काय आहे?

Food and Drug Administration  अमेरिकेतील खाद्य नियमन प्राधिकरण आहे. याद्वारे तेथे नियम तयार केले जातात. मानवी आरोग्याला हानीकारक ठरणार नाही इतक्या प्रमाणात खाद्यपदार्थांमध्ये दोष पातळी राखण्याची अमेरिकेत मुभा आहे. त्यासाठी ‘एफडीए’ने एक प्रमाण ठरवलेले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती Food Defect Levels Handbook मध्ये दिलेली आहे.

अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालामधून नैसर्गिकरित्या आढळणारे, आरोग्यास हानीकारक नसलेले दोष शंभर टक्के वेगळे करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. त्यामुळे एका निश्चित पातळीपर्यंत हे नैसर्गिक दोष राहू देण्यास ‘एफडीए’तर्फे परवानगी देण्यात आली आहे. पण याचा अर्थ असा नाही की, खाद्यनिर्मिती कंपन्यांनी त्या पातळी खाली दोष ठेवले म्हणजे झाले. त्यांनी शक्य होईल तितकी काळजी घेणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार, या नियमांमध्ये सुधार करण्याचीदेखील तरतूद आहे.

मूळ नियम येथे वाचा – Food Defect Levels Handbook

‘एफडीए’च्या नियमांनुसार, चॉकलेट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कोको बियांमध्ये 4 टक्के मोल्ड असण्याची मुभा आहे. यामध्ये झुरळ असे म्हटलेले नाही. जे नैसर्गिक दोष असतात ते मान्य आहेत हानीकारक कीटक मान्य नाही.

निष्कर्ष

भारतात तयार होणाऱ्या चॉकलेटमध्ये झुरळ राहू देण्याची परवानगी नाही. अमेरिकेतील एफडीएच्या नियमांचा चुकीचा अर्थ लावण्यात येत आहे.

Avatar

Title:चॉकलेटमध्ये 4 टक्के झुरळ असतात का? वाचा त्या व्हायरल मेसेजमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False