शिवसेनेच्या विरोधात जमीयत उलेमा-ए-हिंदच्या नावे फिरणारे ते व्हायरल पत्र बनावट. वाचा सत्य

False राजकीय

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास एक महिना होत आला तरी महाराष्ट्रात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे आकडेवारीची जुळवाजुळव सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा महाआघाडीचे नवे समीकरण तयार होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एका मुस्लीम संघटनेने सोनिया गांधी यांना पाठवलेले पत्र सध्या गाजत आहे.

व्हायरल होत असलेल्या या पत्रात जमात उलेमा-ए-हिंद या संघटनेच्या अध्यक्षांनी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा न देण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षाशी मिळून सत्ता स्थापन करणे काँग्रेससाठी हानिकारक ठरून शकते असे या कथित पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र टाईम्स, एबीपी माझा, टाईम्स नाऊ यासह अनेक वृत्तपत्र आणि वाहिन्यांनी ही बातमी प्रकाशित केली. फेसबुकवरदेखील अनेक युजर्सने हे पत्र शेयर केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ लेख येथे वाचा – फेसुबकमहाराष्ट्र टाईम्सअर्काइव्ह

काय आहे पत्रात?

सोनिया गांधी यांना 18 नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या या कथित पत्रात जमीयत उलेमा-ए-हिंद संघटनेचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी म्हणतात, ‘मी महाराष्ट्रातील खराब राजकारणाकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार करत आहात हे दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षासाठी हा निर्णय अत्यंत धोकादायक आणि घातक सिद्ध होईल.’

तथ्य पडताळणी

या पत्राची बारकाईने पडताळणी केल्यावर त्यातील अनेक विसंगती आणि चुका समोर येतात. त्या खालीलप्रमाणे आहेत.

1. जमीयतच्या सोशल मीडिया अकाउंटवर उपलब्ध असणारे अधिकृत पत्र आणि प्रेस रिलीजमध्ये रेफरन्स क्रमांक JUH/LTR or PR/Year/ या नमुन्यात असतो. म्हणजे पत्र जर 2019 मधील असेल तर JUH/LTR/2019 किंवा प्रेस रिलीज 2017 ची असेल JUH/PR/2017 असा रेफरन्स क्रमांक असतो. परंतु, 2019 मध्ये लिहिलेल्या व्हायरल पत्रामध्ये रेफरन्स क्रमांक JHU/LTR/20169 असा आहे. ही एक चूक आहे.

2 & 4. पत्राचे पहिले आणि शेवटचे वाक्य लेफ्ट मार्जिनपासून वेगवेगळ्या अंतरावर आहे. त्याला वर्ड इन्डेट (Word Indent) म्हणतात. अधिकृत पत्रामध्ये अशी बारीक चूक होणे अपेक्षित नाही.

3. शिवसेना या पक्षाचे नावच चुकले आहे. पत्रामध्ये ‘शिवशेना’ (Shiv Shena) असे लिहिलेले आहे. ते Shiv Sena हवे होते. तसेच support या शब्दात एस हे अक्षर कॅपिटल नको होते.

5. फॉरमल पत्राच्या शेवटी Complimentary Close (Yours, Sincerely) लिहिण्याचा दंडक आहे. अरशद मदनी यांच्या सहीच्यावर तसे काहीच लिहिलेले नाही.

जमीयत उलेमा-ए-हिंद संघटनेने खरंच सोनिया गांधी यांना पत्र लिहून शिवसेनेसोबत न जाण्याचा सल्ला दिला का हे शोधण्याचा प्रयत्न केला असता, संघटनेच्या ट्विटर अकाउंटवरून हे पत्र खोटं असल्याचा खुलासा आढळून आला. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.45 वाजता केलेल्या ट्विटमध्ये व्हायरल पत्राचा फोटो शेयरकरून म्हटले की, महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंदर्भात जमीयत उलेमा-ए-हिंदने कोणतेही पत्र लिहिलेले नाही. ते पत्र बनावट आणि खोटं आहे.

अर्काइव्ह

मौलाना अरशद मदनी यांचा खुलासा

फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट मौलाना अरशद मदनी यांच्या संपर्क केला. हे पत्र बनावट असून, ते मी किंवा जमीयत उलेमा-ए-हिंदतर्फे लिहिण्यात आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “आमची संघटना राजकीय नाही. आम्ही राजकीय विषयांमध्ये दखल देत नाही. महाराष्ट्रात सरकार कोणाचे व्हावे आणि कोणाचे नाही यापेक्षा तेथे लवकर सरकार स्थापन व्हावे याला माझ्यालेखी जास्त महत्त्व आहे. जमीयत कोणत्याही पक्षाचा राजकीय विरोध करीत नाही. राहिला प्रश्न त्या पत्राचा तर, मी किंवा आमच्या संघटनेने सोनिया गांधी यांना ते पत्र लिहिलेले नाही. ते पूर्णतः खोटं पत्र आहे.

श्री. मदनी यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, ‘जमीयत’च्या अधिकृत लेटरहेडवरील सगळ्या पत्रांमध्ये त्यांच्या नावाआधी ‘मौलाना’ लिहिले जाते. सदरील व्हायरल पत्रात त्यांचा केवळ अरशद मदनी असा उल्लेख आहे. तसेच ती सही त्यांची नाही. ते एका खास पेनाद्वारे स्वाक्षरी करतात. जमीयतच्या ट्विटरवरील एका अधिकृत पत्रामधील श्री. मदानी यांची सही आणि व्हायरल पत्रातील स्वाक्षरी यांची तुलना केल्यावर दोन्हीमधील फरक लगेच लक्षात येतो.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, सोनिया गांधी यांना लिहिलेले जमीयत उलेमा-ए-हिंदच्या नावे फिरणारे पत्र बनावट आहे. ‘जमीयत’तर्फे यासंबंधी खुलासा करण्यात आलेला आहे. अनेक वृत्तस्थळे आणि वृत्तवाहिन्यांनी ही चुकीची बातमी प्रसिद्ध केली. 

Avatar

Title:शिवसेनेच्या विरोधात जमीयत उलेमा-ए-हिंदच्या नावे फिरणारे ते व्हायरल पत्र बनावट. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False