चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘भाजपला मतदान करू नये’ असे आवाहन केले का? वाचा सत्य

False राजकीय | Political

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने अनेक विद्यमान मंत्री आणि आमदारांना तिकीट नाकारून सर्वांनाच धक्का दिला. भाजपच्या या धक्कातंत्राची पहिली झलक एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्या रुपाने पाहायला मिळाली. आता यामध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश झाला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांना तिकीट न देता त्यांच्याजागी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

उमेदवारी नाकारल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे नाराज असल्याचे बोलले जात आहे. याच नाराजीतून त्यांनी भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केल्याचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर बराज गाजत आहे. या क्लिपच्या माध्यमातून बावनकुळे यांनी नाराज होऊन बंडाचे संकेत दिल्याचा कयास लावला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेयर केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची चार सेंकदाची एक व्हिडियो क्लिप आहे. यामध्ये ते स्वतः म्हणतात की, “भारतीय जनता पक्षाला मतदान करू नये.”  फेसबुकवर विविध पेज आणि युजर्सने हा व्हिडियो शेयर केला.

पार्श्वभूमी

महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी पत्नी ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. बावनकुळे या भाजपच्या उमेदवार नसतील, हे भाजपने स्पष्ट केले आहे. त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली. तिकीट मिळणार नसल्याचे सप्ष्ट झाल्याने ज्योती बावनकुळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. 

स्वतःला व पत्नीला पक्षाने तिकीट नाकारल्याने नाराज होऊन बावनकुळे यांनी खरंच भाजपविरोधात जाऊन पक्षाला मतदान न करण्याचे व्हिडियोद्वारे आवाहन केले का?

याचे उत्तर “नाही” असे द्यावे लागेल.

तथ्य पडताळणी

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून 5 ऑक्टोबरला तीन मिनिटांचा एक व्हिडियो शेयर करण्यात आला होता. या व्हिडियोमधून ही चार सेंकदाची क्लिप घेण्यात आलेली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहेल की, मला उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्ते सोशल मीडिया वर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि जातीशी संबंधित पोस्ट टाकत आहेत. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कि, आपण अशी कुठलीही पोस्ट पाठवू नये, आली असेल तर ती डिलिट करावी. महाराष्ट्र आणि देश मजबूत करण्यासाठी सर्वांनी महायुतीला मतदान करावं असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो.

हा संपूर्ण व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबक

सदरील व्हिडियोमध्ये बावनकुळे यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आणि जनतेमध्ये नाराजी असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्त्वामध्ये देशाला मजबूत करण्याच्या संकल्पाला पाठिंबा देण्याचे त्यांनी आवाहन केले.

पक्षाने पक्षाने जिल्हा परिषदेपासून ते मंत्रीपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या दिल्याचे सांगत नितीन गडकरी वडिलांसमान तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. यावेळी माझ्यावर विधानसभेचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणतात की, मला उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते आणि जनता नाराज आहे. कारण त्यांच्या काही अपेक्षा आहेत. परंतु, जातीवादी वातावरण तयार करून भारतीय जनता पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मी आपणास विनंती करतो की, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली देश आणि महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. सर्वांनी भाजप-सेना युतीला मतदान करावं, अशी मी विनंती करतो.

खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये आपण तुलना पाहू शकता. तीन मिनिटांच्या व्हिडियोमधून कशाप्रकारे चार सेंकदाची क्लिप एडिट करून चुकीचा संदेश पसरविण्यात आला.

निष्कर्ष

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकरल्यामुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराज होऊन भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केलेले नाही. त्यांचा व्हिडियो एडिट करून तशी क्लिप पसरत आहे. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून नका. तुमच्याकडेसुद्धा अशाच काही शंकास्पद बातम्या, पोस्ट, मेसेज, फोटो आणि व्हिडियो असल्यास तो फॅक्ट क्रेसेंडोकडे तथ्य पडताळणीसाठी 9049043487 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांवर पाठवा.

Avatar

Title:चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘भाजपला मतदान करू नये’ असे आवाहन केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False